मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व || खंडोबाचे नवरात्र || खंडोबाचे नवरात्र कसे बसवावे || नवरात्रात खंडोबाची स्थापना करणे || नंदादीप || चंपाषष्ठीचा महानैवेद्य || दिवटी आणि बुधली || तळी भरणे || चंपाषष्ठीचे उत्थापन (विसर्जन).

मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व

मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूचा आवडता महिना आहे. या महिन्यात विष्णूची सेवा केली असता अगणित पुण्य मिळते, असे धर्मशास्त्र सांगते. या महिन्यात लक्ष्मीपूजा करून देवीजवळ प्रिय विष्णूचे नाव मुखात राहू दे व या देवाची सावली सतत माझ्यावर राहू दे, अशी प्रार्थना केली जाते.

विष्णूचे राम व कृष्ण हे अवतार आहेत यापैकी कोणत्याही देवाची पूजा केली की ती विष्णूला मिळते. या महिन्यामध्ये रामरक्षा, विष्णुसहस्र नामावली, भागवतग्रंथ, भगवद्‌गीताही वाचावी. जास्तीत जास्त नामस्मरणाकडे या महिन्यात ध्यान द्यावे. मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीपूजन, खंडोबाचे नवरात्र, चंपाषष्ठी, दत्तजयंती व गीताजयंती, अन्नपूर्णा जयंती हे सण येतात. या महिन्यात खोटे बोलणे, इतरांची निंदानालस्ती करणे, द्वेष तिटकारा करणे हे टाळावे. तसेच मार्गशीर्ष महिन्यात ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः’ या मंत्राचा सतत जप करावा. या महिन्यात पूजापाठ केल्याने आपल्याला सुखशांती, समाधान मिळते तसेच मनातील वासना घालविल्या जातात.

खंडोबाचे नवरात्र (मार्गशीर्ष प्रतिपदा ते मार्गशीर्ष षष्ठी)

बऱ्याच जणांकडे खंडोबा हे कुलदैवत असल्यामुळे त्याच्याकडे मार्गशीर्ष प्रतिपदेपासून मार्गशीर्ष षष्ठीपर्यंत सटीचे नवरात्र म्हणजेच खंडोबाचे नवरात्र कुळधर्म म्हणून पाळले जाते. खंडोबाची तांदळा, शिवलिंग आणि चतुर्भुज मूर्ती या तीनही रूपकांची पूजा केली जाते. बरोबर कुत्रा आणि घोडा असतोच. ज्यांच्याकडे खंडोबाचे नवरात्र असते त्यांच्याकडे खंडोबाचा टाक असतो त्याच टाकावर नवरात्र बसवले जाते.

खंडोबाचे नवरात्र कसे बसवावे

प्रतिपदेच्या दिवशी सकाळी लवकर उठून सडासंमार्जन करून रांगोळी काढावी. देवघर स्वच्छ झाडून पुसून घ्यावे. सगळ्या देवांची पंचोपचार पूजा करून त्यांची पुन्हा देवघरात स्थापना करावी. उजव्या हाताला नंदादीप म्हणजेच समईची स्थापना करावी. त्याखाली एक ताटली ठेवावी. समईच्या बाजूने रांगोळी काढावी. समईत तेल घालावे. हाताची एक वीत दोन बोट ह्या मापाने वात करून समईत घालून समई लावावी (प्रज्वलित करावी). समईला हळद- कुंकू, फुले व अक्षता वाहाव्यात. त्याचप्रमाणे शंख व घंटा यांची पूजा करावी. नंतर गणपतीची पूजा करावी. खंडोबाच्या टाकाला पंचामृताने स्नान घालून पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालावे. देवघरात एका विड्याच्या पानावर स्वस्तिक काढून त्याच्यावर खंडोबाची स्थापना करावी. खंडोबाला हळद म्हणजेच भंडारा वाहावा, पांढरे तांदूळ वाहावे. काही जणांकडे मात्र कलशाची स्थापना करून ताम्हणात तांदूळ घेऊन त्यावर खंडोबाच्या टाकाची स्थापना केली जाते. या नवरात्रात उपवास केले जातात.

नवरात्रात खंडोबाची स्थापना करणे

तांब्याचा किंवा पितळेचा कलश घ्यावा त्यात पाणी भरावे. कलशाच्या तोंडाला लाल दोरा गुंडाळावा. कलशात रुपया, अक्षता, हळद म्हणजेच भंडारा, दूर्वा, फूल घालावे. कलशावर पाच किंवा सात विड्याची किंवा आंब्याची पाने ठेवावीत. पानांची देठाची बाजू पाण्यात व टोकाची बाजू वर ठेवावी. पानावर एक ताम्हण ठेवावे. ताम्हणात गहू किंवा तांदूळ पसरवून त्यावर खंडोबाच्या टाकाची स्थापना करावी. पूजा करताना सुगंधी फुलं, भंडारा म्हणजेच हळद खंडोबाला वाहावी. हळदीने पिवळे केलेले तांदळाचे दाणेसुद्धा आपण खंडोबाला वाहू शकतो. खंडोबाला प्रिय म्हणजे पांढरी, निळी, तांबडी कमळ, पारिजातक, झेंडूची व मालतीची फुलं अर्पण करावी. यापैकी जी फुलं मिळतील ती खंडोबाला अर्पण करावीत. खंडोबाला पत्री वाहिली जातात. पत्री म्हणून नागवेलीची पाने, हळदीची पाने, बिल्वपत्र, अशोक पत्र, दुर्वांकुर पत्र, तुळशीपत्र, आंब्याची पाने, जाईची, कवठाची, जांभळीची, सब्जाची पाने देवास जास्त प्रिय आहेत. असे मल्हारी महात्म्यामध्ये म्हटलेले आहे. जी जी पत्री पानं मिळतील ती ती खंडोबाला वाहावी. खंडोबासमोर सुगंधी धूप जाळावा. उत्तम वस्त्र व अलंकार देवास अर्पण करावे. देवासमोर दूध ठेवावे. त्रयोदशी गुणी पानाचा देवासमोर ठेवावा. ज्याप्रमाणे आपण देवीच्या नवरात्रात माळ लावतो त्याप्रमाणे खंडोबाच्या नवरात्रात माळ लावतात. पहिली माळ विड्याची पानाची असते. बऱ्याच ठिकाणी नंतर झेंडूच्या फुलांची माळ सोडली जाते.

नंदादीप

अखंड तेलाचा नंदादीप देवासमोर सहा दिवस तेवत ठेवावा. सहा दिवस देवाला रोज माळ सोडावी. रोज पूजा करावी व आरती करावी. आरती करताना पिठाचे दिवे बऱ्याच ठिकाणी केले जातात. खंडोबाच्या मूर्तीची किंवा टाकाची स्थापना केल्यानंतर नवरात्र संपेपर्यंत टाक किंवा मूर्ती हलवू नये. तसेच नंदादीपाची स्थापना केल्यावर पुन्हा नंदादीप हलवू नये. रोज सकाळी समईतील वातीची काजळी दूर करावी, तेल घालावे.

चंपाषष्ठीचा महानैवेद्य

सटीच्या दिवशी पुरणपोळी, वांग्याचे भरीत, बाजरीच्या रोडग्याचा नैवेद्य दाखविला जातो. महाराष्ट्रात चातुर्मासात बरेच जण कांदा, लसूण, वांगी वर्ज्य करतात. परंतु चंपाषष्ठीपासून कांदा, लसूण, वांगी खायला सुरुवात करतात. चंपाषष्ठीला पुरणावरणाचा स्वयंपाक करतात. चंपाषष्ठीला सवाष्ण ब्राह्मण जेवायला बोलवतात. तसेच वाघ्या-मुरळीला सुद्धा भोजन घातले जाते. भोजनानंतर पान विडा दक्षिणा देऊन नमस्कार केला जातो. खंडोबाचे वाहन घोडा व श्वान (कुत्रा) यांनाही नैवेद्य दिला जातो. तसेच तळी भरली जाते.

काही घरातून चंपाषष्ठीच्या दिवशी ‘खंडोबाची वारी’ मागण्याची पद्धत आहे. घरातील सर्व जण वाघ्या मुरळीकडून ‘वारी खंडोबाची’ म्हणून त्याच्या पानातून पुरणपोळी घेतात आणि तो प्रसाद म्हणून ग्रहण केला जातो. तसेच खंडोबाचा वार रविवार या दिवशी ताम्हण घेऊन ‘वारी खंडोबाची’ असे म्हणत म्हणत कोरडे पीठ घराघरांतून मागितले जाते. वारीमध्ये मग त्या पिठाची भाकरी करून सगळे जण प्रसाद म्हणून खातात.

दिवटी आणि बुधली

खंडोबाच्या नवरात्रात दिवटी, बुधली यांना महत्त्व असते. मणिमल्हार या राक्षसाचा वध केल्यानंतर त्या ठिकाणी अंधार झाला होता. तो अंधार दूर व्हावा म्हणून भक्तांनी हातात दिवटी प्रज्वलित करुन मल्हारी देवास ओवाळले. देवाची पूजा करून नैवेद्य दाखवीला जातो. नैवेद्य दाखवल्यावर दिवटी दुधाने शांत केली जाते. लग्नकार्यात खंडोबाचे तसेच देवीचे जागरण-गोंधळ करण्याची प्रथा आहे.

तळी भरणे

तळीमध्ये घरातील सर्व पुरुष व लहान मुले एकत्र गोल करून बसतात. मध्ये एक ताट किंवा ताम्हण घेतले जाते. त्यात खोबऱ्याचे तुकडे व हळद (भंडारा) ठेवला जातो. विड्याच्या पानावर खोबऱ्याच्या वाटी ठेवतात. सर्व पुरुष मंडळी त्या ताम्हणाला हात लावून “येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट” असे म्हणून ते ताम्हण पाच वेळा कपाळाला लावतात. ताम्हण वर उचलताना सगळ्यांचा हात ताम्हणाला लागलेला असतो. पुन्हा ते ताम्हण खाली घेतात पुन्हा वर उचलून कपाळाला लावतात. असे पाच वेळा करतात. ह्याला ‘तळी भरणे’ असे म्हणतात. नंतर तो भंडारा (हळद) कपाळाला लावला जातो. ‘खोबर’ प्रसाद म्हणून दिले जाते. दिवटी बुधली देवासमोर प्रज्वलित केली जाते. व दिवसामध्ये ‘मार्तंड भैरव स्तोत्रा’चे आणि ‘मल्हारी विजय’ ग्रंथाचे वाचन करावे. या सहा

चंपाषष्ठी

चंपाषष्ठी श्री खंडेरायाच्या उपासनेमधला अत्यंत महत्त्वाचा उत्सव व दिवस होय. श्री मल्हारी मार्तंडांचे षड्रात्र उत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजे सांगता दिवस म्हणजे चंपाषष्ठी होय. या दिवशी मार्तंड भैरवनाथाने मल्लासुर दैत्याचा संहार केला व सगळ्याची संकटातून मुक्तता केली व भूतलावरचे म्हणजेच पृथ्वीवरचे अरिष्ट टळले, देवगणांना अत्यंत आनंद झाला, त्यांनी मार्तंड भैरवावर भंडाऱ्याबरोबर चंपावृष्टी म्हणजेच चाफ्याची फुले उधळली म्हणून मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपाषष्ठी असे नाव पडले. नवरात्रात मांसाहार, मद्यपान करू नये, घरामध्ये व्रत पाळावे, उपवास करावा. आचरण शुद्ध ठेवावे आणि मुख्य म्हणजे घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील याचा कटाक्षाने प्रयत्न करावा. एकदा खंडोबाच्या टाकाची प्रतिष्ठापना केली की नंतर नवरात्राच्या सहा दिवस खंडोबाच्या टाकाला भंडारा वाहावा. शिळी फुले काढून टाकावी. तसेच खंडोबाचा टाक न हलवता इतर देवांना स्नान घालून त्यांची पूजा करू शकतो.

चंपाषष्ठी उत्थापन (विसर्जन)

चंपाषष्ठीच्या दिवशी देवाला पुरणावरणाचा, बाजरीच्या रोडग्याचा, वांग्याच्या भरताचा नैवेद्य दाखवून आरती करावी. नैवेद्याचे ताट पाच मिनिटे देवापुढे ठेवावे. अर्ध्या तासाने प्रसाद म्हणून सर्वांना वाटावे, पदार्थ उरले तर गायीला घालावे. हातामध्ये पांढरे तांदूळ घेऊन ते कलशावर वाहावे व कलश हलवून ठेवावा. माळा काढून त्या कलशावर ठेवाव्यात यालाच ‘घटस्थापनेचे उत्थापन असे’ म्हणतात. दुसऱ्या दिवशी नारळ काढून त्याचा गोड पदार्थ करावा. विड्याची पाने काढून, पाने फुले बागेमध्ये त्याचे विसर्जन करावे. कलशामधील पाणी घरात शिंपडावे. उरलेले पाणी झाडाला घालावे.

चंपाषष्ठीचे नवरात्र झाल्यावर कांदा, लसूण, वांगी खाण्यास सुरुवात करतात. देवापुढील नैवेद्य सर्वांनी थोडा थोडा घेऊन उरलेला गायीला द्यावा.

Leave a Comment