जन्म आणि लहानपण
बाबा आमटे यांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ मध्ये विदर्भातील हिंगणघाट येथे झाला. मुरलीधर देविदास आमटे असे त्यांचे नाव. बाबाचा एका ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला.
बाबांचे वडिल सरकारी नोकरी करीत होते. बाबांना एक लहान भाऊ व चार बहिणी होत्या. बाबांचे बालपण खूप ऐशोरामात, सुखात व श्रीमंतीत गेले. त्यावेळी रेशमी सदरा, डोक्यावर जरीची टोपी व पायात बूट असा त्यांचा पोशाख होता. त्या पोशाखामध्ये ते अगदी रुबाबदार दिसायचे. बाबा वडिलांना खूप घाबरत कारण ते खूप कडक स्वभावाचे होते. त्यामुळे वडिलांना पहिले की त्यांना त्यांची भिती वाटत असे. बाबा लहानपणी आईला सडा घालणे, रांगोळी काढणे, दळणकांडण अशा घरकामात आनंदाने मदत करीत असे. पण बाबाचे हे काम करणे त्यांच्या वडिलांना आवडत नसे. बाबांना श्रीमंत मुलासारख्या सर्व सवयी असाव्यात असे त्यांच्या वडिलांना वाटे. त्याचप्रमाणे बाबांचे नोकरांबरोबर बोलणे, रहाणेही त्यांना आवडायचे नाही.
बाबांचा दानशूरपणा
त्यावेळी बाबा नऊ-दहा वर्षाचे असतील. दिवाळीचा सण होता. दिवाळीसाठी पाच-पाच रुपयांची चिल्लर देऊन बाबा व त्यांचा भाऊ मधू या दोघांना नोकराबरोबर फटाके आणण्यासाठी बाबांच्या वडिलांनी पाठवले. फटाके घेत असताना तिथे एक भिकारी आला. त्यांच्या भावाने म्हणजे मधूने त्याच्या जवळील पैशाचे फटाके घेतले पण बाबांनी मात्र त्यांच्याजवळील पैसे त्या भिकाऱ्याच्या भांड्यामध्ये टाकले. भिकाऱ्याला ते इतके सारे पैसे बघून अतिशय आनंद झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते पाहून छोट्या देवीदासला म्हणजेच बाबांना आपण फटाके न घेता ते पैसे भिकाऱ्याला दिले याचा खूप आनंद झाला आणि त्यांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. अशा प्रकारे बाबांना लहानपणासूनच गरीबांविषयी कनवाळा होता.
बाबांना हिंडायला, फिरायला खूप आवडत असे. एक दिवस वडिलांना न सांगता बाबा रविंद्रनाथ टागोर यांना भेटायला शांतिनिकेतनमध्ये गेले होते. त्यावेळी साधारण ते चौदा पंधरा वर्षाचे असतील. नर्मदेचा उगम पहायलाही अमरकंटकलाही ते जाऊन आले होते. ते कधी कधी चंद्रपूरमधील घनदाट जंगलात रहाणाऱ्या आदिवासींच्या वस्तीमध्ये जात. त्यांची जीवनपध्दती जवळून बघत. त्यांच्याशी गप्पा मारीत.
शिक्षण
बाबांच्या घरची परिस्थिती चांगली असल्याने त्यांच्या वडिलांनी नागपूरात अलिशान बंगला बांधला. बाबांना इंग्रजी शाळेत घातले होते. तसेच नागपूरच्या महाविद्यालयात त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. बाबांना आपण डॉक्टर व्हावं अशी मनापासून इच्छा होती परंतु वडिलांपुढे त्यांचं काही चाललं नाही. वडिलांनी त्यांना जबरदस्ती करून बी. ए. च्या वर्गात प्रवेश घ्यायला लावले. बाबा हिस्लॉप कॉलेजमध्ये शिकायला जाताना घोडागाडीतून जात, अगदी कडक इस्त्रीच्या सूटाबूटात. कॉलेजीयन वातावरण हे ख्रिश्चन होते अशा वातावरणात त्यांचे शिक्षण झाले. त्यावेळी इंग्रजांचे राज्य होते. तेव्हा या वयात त्यांनी क्रांतीकारकांना मदत करायचे ठरवले. ते क्रांतिकारकांची शस्त्रास्त्रे लपवून ठेवण्याचे, निरोप पोहोचविण्याचे काम करीत असत. भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांच्याबद्दल बाबांना खूप प्रेम होते, आपुलकी होती. काही महिन्यानंतर भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांना फाशीची शिक्षा झाली. हे ऐकून बाबांना अतिशय वाईट वाटले.
बाबांची आवड व छंद
बाबांना वाचन करायला अतिशय आवडे. त्यातल्या त्यात त्यांनी इंग्रजी साहित्य खूप वाचले. तसेच त्यांनामोटारीतून फिरणे, सिनेमे पाहणे, शिकार करणे असे छंदही होते. ते जास्त अभ्यासाकडे लक्ष देत नसत. अगदी शेवटचे दोन महिने अभ्यास करून बाबा कायद्याची पदवी परीक्षा पास झाले. बाबांच्या वडिलांची इच्छा होती की बाबांनी वकील व्हावे म्हणून वडिलांच्या म्हणण्यानुसार बाबांनी श्री. विश्वनाथराव तामस्कर यांच्याबरोबर छत्तीगडमधील दुर्ग जिल्ह्यात वकिली केली. परंतु त्यामध्ये ते जास्त रमले नाही. त्यांच्या बुद्धीला गुन्हेगारांना आरोपातून मुक्त करण्यासाठी बुद्धी आणि वेळ वाया घालवून खऱ्याचे खोटे व खोट्याचे खरे करणे हे पटले नाही. म्हणून त्यांनी वकीली सोडली आणि १९४०मध्ये ते वरोड्याला आले. वरोड्यात ते आपली शेतजमीन पाहू लागले.
सुटबूट, टाय घालायचे सोडले
महात्मा गांधी हे १९३६ मध्ये वर्ध्यातील सेवाग्राममधे रहायला आले. त्यावेळी बाबांना गांधीवादाचे आकर्षण वाटू लागले. गांधीचा आदर्श घेऊन बाबांनी देशासाठी कठोर व्रत साधना सुरू केली. त्यामुळे त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. बाबांनी गांधीजीच्या विधायक कार्यक्रमात भाग घेण्याचे ठरवले. भंगी, कातकरी, चांभार, कामगार यांच्या सहकारी संघटना बांधू लागले. गरीब लोकांना ते मदत करू लागले. गांधीजींच्या सहवासात रहायला लागल्यापासून त्यांनी सूटबूट-टाय घालायचे सोडून दिले. देवीदास म्हणजे बाबा आता खादीचे कपडे घालू लागले. चमचमीत, खमंग पदार्थ असलेले भोजन त्यांनी बंद केले. अगदी साधा आणि मोजकाच आहार ते घेऊ लागले. हा नियम बाबांनी सहा वर्ष पाळला. बाबांनी ‘भारत छोडो’ चळवळीतसुद्धा भाग घेतला होता. त्यात त्यांना एक दिवसाची शिक्षा झाली होती. चंद्रपूरच्या तुरूंगामध्ये त्यांना ठेवण्यात आले होते. त्यामुळे बाबांना सत्याग्रही म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी दुःखी, गरीब, दलितांच्या सेवेला वाहून घेतले.
इंदूशी विवाह
नागपूरात रहाणारे घुले शास्त्री यांच्याशी त्यांचे अगदी जवळचे संबध होते. त्यामुळे बाबांचे धुले शास्त्रींकडे नेहमी जाणे-येणे असे. त्यांची मुलगी इंदू घुलेबरोबर बाबांचे पत्र व्यवहार सुरू होते. बाबांना इंदू आवडत असे. सेवाभावी, मायाळू व कष्टाळू स्वभाव असलेल्या इंदूच्या प्रेमात देविदास पडला. परंतु इंदूच्या आईची या लग्नाला सम्मती नव्हती. मुलगा लहरी दिसतो, त्यांच्याबरोबर आपली मुलगी सुखी होईल की नाही याची काळजी तिला सारखी वाटत होती. परंतु इंदूला बाबा पसंत असल्यामुळे तिचा लग्नाचा निर्णय अगदी पक्का होता. शेवटी कसेबसे इंदूशी लग्न ठरले.
लग्नाच्या वेळी रात्री घुले वाड्यामध्ये चोर शिरले. त्यांच्या हातामध्ये चाकू सुऱ्या होत्या. चोरांना पाहून बाबांनी त्यांच्याशी झोंबाझोंबी केली. मारामारी करत असताना बाबा जखमी झाले. त्या जखमी अवस्थेमधेही त्यांनी विवाह मुहूर्त चुकविला नाही की लग्नाची तारीख पुढे ढकलू दिली नाही. जर तारीख पुढे ढकलली असती तर सासूचे मन कदाचित पालटले असते. अशी भिती बाबांना वाटत होती. अशा प्रकारे देविदास-इंदूचे लग्न १८ डिसेंबर १९४६ मध्ये झाले. इंदूने बाबांना पत्नी म्हणून चांगली साथ दिली.
बाबांकडे सर्वजण आश्चर्याने बघायचे. बाबा असे का वागतात? बाबांच्या घरची परिस्थिती चांगली असून हे असे गरीबासारखे का रहातात ? पण बाबांचा स्वभाव म्हणजे प्रत्येक गोष्ट ते अनुभवायचे आणि नंतरच स्विकारायचे. हीच जिद्द आणि चिकाटी त्यांना नंतर पुढे आपल्या ध्येयापर्यंत पोहचवायला कारणीभूत ठरली. इंदू ऊर्फ साधनाताई बाबांच्या आयुष्यात आल्या आणि त्यांनी बाबांचे जीवन उजळून टाकले. दोघांचा सुखी संसार सुरू झाला. इंदू उर्फ साधनाताई त्यावेळी वीस वर्षाच्या होत्या. १९४७ मध्ये त्यांना मुलगा झाला, त्याचे नाव विकास ठेवले.
‘श्रमाश्रम संकल्प’
बाबांना खूप मित्र होते. बाबांनी कधी जातीभेद पाळला नाही त्यामुळे त्यांचे विविध धर्मातील लोक मित्र झाले. त्यात महार, चांभार, बुरूड, कोष्टी, ब्राह्मण अशा सर्व जाती-जमातीचे लोक त्यांची भेट घ्यायला येत असत. बाबांनी साम्य कुलाचा प्रयोग करण्याचे ठरवले. सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र आणून ‘श्रमाश्रम’ करण्याचा संकल्प त्यांनी केला. पण तेव्हा बाबांकडे पैसे मिळवण्याचे काहीच साधन नव्हते. वकिलीची सनद त्यांनी केव्हाच फाडून टाकली होती.
सर्वांनी अगदी ब्राह्मणापासून ते अंत्यजापर्यंतच्या लोकांनी एकत्र राहून आपापले व्यवसाय करायचे, सर्वांनी येईल तो पैसा एकत्र करायचा, एकत्र खर्च करायचे आणि गरजाही एकत्रित भागवायच्या असा ठराव झाला. बाबा वरोड्यात ज्या ठिकाणी रहात होते त्या ठिकाणी जे त्यांचे घर मालक होते ते जात-पात मानणारे होते म्हणून त्यांनी ती जागा सोडली आणि मध्यप्रदेशचे त्या वेळी असलेले मुख्यमंत्री श्री. रा. कृ. पाटील यांच्याकडे ‘श्रमाश्रम’ संकल्पासाठी जागा मागितली. त्यांनी जागा देण्यासाठी मंजूरी दिली. ही जागा वरोड्यापासून पाच मैल अंतरावर होती. तिथे त्यांना सात एकर जागा मिळाली.
त्या जागेवर बाबा साम्य कुळाचा श्रमाश्रमाचा प्रयोग करीत होते तेव्हा विनोबा भावे यांनी त्यांना शंभर रुपये पाठवले आणि सांगितले की ‘एका फकिराने तुमच्या श्रमाश्रमासाठी ही देणगी दिली आहे. या पैशाचे दूध आणून पी.’ पैसे येण्याचे काहीच साधन नसल्याने गांधी-विनोबा यांनी साहित्याची विक्री, ग्रामोद्योगांच्या वस्तूची विक्री करण्याचे ठरवले.
बाबा पहाटे चार वाजता उठायचे, प्रार्थना करायचे, न्याहारी करून ते शेतावर कामाला जायचे. अशा प्रकारे ते रोज अठरा अठरा तास शेतामध्ये काम करत असत. साधनाताई आश्रम, संसार दोन्ही योग्यपद्धतीने सांभाळीत होत्या. बाबा शेतात आलेल्या भाजीच्या टोपल्या घेऊन बाजारात स्वतः विकत बसत. साधनाताईही त्यांना मदत म्हणून झाडू, टोपली, केरसुणीची फडे बनवायला शिकू लागल्या. परंतु पुढे काही दिवसातच त्या आजारी पडल्या. त्या नागपूरला आपल्या माहेरी गेल्या. पैशाचा स्त्रोत नसल्यामुळे पैशा अभावी, मलेरियाच्या साथीमुळे श्रमाश्रम मित्रवस्तीचा प्रयोग फसला. पण बाबा डगमगले नाहीत की हार मानली नाही. ते विनोबाजींकडे गेले. तेव्हा विनोबांनी सांगितले की ‘तुम्ही निष्ठा ठेवून सेवा करा- सर्वांना प्रेम द्या, फळाची अपेक्षा धरू नका, तुम्ही आता जरी अडखळून पडलात तरी उद्या याच अनुभवामुळे धावू लागाल. तुम्ही हार मानू नका तुमच्या हातून खूप मोठे कार्य होणार आहे.’
बाबांचा संसार
जंगलामधील झोपडीत बाबांचा संसार सुरू झाला होता. कष्ट, काम करत रहाणे हे जणू बाबांचे ध्येयच बनले होते. मोठ्या कष्टाने बाबांनी विहिरी खोदल्या, शेताची मशागत केली. स्वतः बाबा नांगर धरायचे आणि साधनाताईनी पेरणी करायच्या.
नंतर बाबांच्या डोक्यात कुष्ठरोग्यांविषयी माया निर्माण झाली. त्यांनी कुष्ठरोगाबद्दल सविस्तर माहिती घेऊन त्याचे प्रशिक्षण घेतले आणि कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचा निर्धार केला. आपला रोग बरा होणार नाही, आपल्याला कोणी जवळ करीत नाही या विचाराने महारोग्यांची मने ढासळली होती. त्यांचा आत्मविश्वास जागवणे गरजेचे होते. हे काम बाबांनी केले. यासाठी त्यांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना डॉक्टर केले. अनाथ मुलांवर, कुष्ठरोग्यांवर प्रेम करून आनंदवनात त्यांनी गोकुळ निर्माण केले. ‘सहसंवेदना’ हा आनंदवन रहिवाशांचा धर्म आणि शिकवण आहे. आनंदाश्रमात अनाथ मुले आणि कुष्ठरोगी येऊ लागले. त्या ठिकाणी त्यांची सेवा होऊ लागली. बाबांच्या खांद्याला खांदा लावून साधनाताई काम करू लागल्या. अनेक संकटामध्ये न डगमगता बाबांना त्यांनी साथ दिली. बाबांच्या कार्यात साधनाताईंची खूपच मदत झाली.
कुष्ठरोग निर्मूलन
‘मलीन मन म्हणजे खरा महारोग आहे. आपल्या देशात एकही महारोगी उपचार घेतल्या बिगर राहू नये. अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे.’ असे त्यांचे म्हणणे आहे.
महारोग्यांची फक्त सेवाच केली नाही तर त्यांना हक्काचे ‘स्नेहसदन’ बांधून दिले. हे काम अतिशय मोठे आणि अवघड होते. समाजसेवेपेक्षाही याचा आवाका खूप मोठा होता. फक्त माणूस म्हणूनच नाही तर एक सक्रीय घटक म्हणून बाबांनी महारोग्यांना समाजात दाखल केले.
आनंदवन
वरोड्याजवळ सात एकर सरकारी जमीन मिळाली. ती मध्यप्रदेशचे मंत्री श्री. रा. कृ. पाटील यांच्या सहकार्याने. तेथील दत्तपूरच्या कुष्ठधामातून बरे झालेले सहा कुष्ठरोगी आले. मिळालेली ही जागा गावापासून खूप लांब होती. अगदी ओसाड माळरान होते हे. जंगल सफाई, जमिनीची मशागत, विहिर खोदणे अशी सारी कामे बाबांनी स्वतः आपल्या हाताने केली. मार्च १९५१ साली त्यांनी आनंदवनाची स्थापना केली.
कुष्ठरोग्यांची सेवा करत असताना बाबा चामड्याची चप्पल वापरत परंतु कुष्ठरोग्यांना चामड्याची चप्पल चालत नाही म्हणून त्यांनी टायरच्या रबरी चप्पल वापरायला सुरुवात केली. तेथील सर्वजण टायर रबराच्याच चपला वापरू लागले. बाबांबरोबर साधनाताईही छोटी-मोठी कामे करतच होत्या. बाबांना विकास आणि प्रकाश अशी मुले झाली ती या परिस्थितीतही इकडून तिकडे हुंदडत-बागडत होती.
बाबांची शेती
बाबांनी रोग्यांमधील आत्मविश्वास वाढवला. त्यांच्याकडून जमिनीची मशागत करून घेऊ लागले आणि स्वतः त्यांच्याबरोबर काम करत होते आणि इथूनच आनंदवनाच्या शेतीला सुरूवात झाली. नंतर शेतीच्या मशागतीची अवजारे आली. मग काय बाबांना शेती करण्याचं नवीन तंत्रच सापडलं. यामुळे शेती करणे सोपं झालं होतं. महारोग्यांविषयी एवढी आपुलकीची भावना पाहून रोग्यांमधील आत्मविश्वास वाढला होता. हा त्यांचा आत्मविश्वास बघून बाबांना खूप आनंद झाला. रोग्यांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसू लागला म्हणून या प्रकल्पाचे नाव बाबांनी ‘आनंदवन’ ठेवले.
बाबा आमट्यांनी ग्रामसफाई, रस्ते झाडलोट करणे, हरिजन संघटना बांधणे, कष्टकरी वर्गाच्या सहकारी संस्थांना जणू वाहून घेतले होते. १९४९ साली बाबांनी वरोड्याला ‘महारोगी सेवा समितीची’ स्थापना केली व १९५० मध्ये कलकत्त्याचे ‘स्कूल ऑफ ट्रपिकल मेडिसीनचा स्पेशलाईज्झड कोर्स इन लेप्रसी’ चे प्रशिक्षण बाबांनी घेतले. बाबांचे महारोग्याविषयीचा सेवाभाव हे खरंच एक फार मोठे धाडसाचे काम होते.
पुरस्कार
अमेरिकेहून १९८३ मध्ये कुष्ठसेवेच्या स्मरणार्थ डेमियन डटन फाऊंडेशन अॅवॉर्ड बाबांना मिळाले. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, प्रादेशिक स्तरावर त्यांना अनेक पुरस्कार, सन्मान मिळाले. या गोष्टींमुळे बाबांना कधीच गर्व झाला नाही. बाबांच्या आनंदवनाला तिबेटचे धर्मगुरू दलाईलामा यांनीही भेट दिली. त्यांनी आनंदाने वीस हजार डॉलर्सची देणगी देण्याचे जाहीर केली. बाबांना ‘टेम्पलटन जनसेवक’ पुरस्कार मिळालेला आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रसिद्ध वैज्ञानिक चार्ल्स एल. बिच यांच्याबरोबर संयुक्तरूपाने त्यांना मिळाला होता. आनंदवनात अजून नवनवीन योजना तरुणांसाठी राबवल्या जाणार आहेत. खरंच बाबा आमटे धन्य आहेत, असे पुष्कळ बाबा तयार होऊन समाजसेवा करोत, त्यातच देशाची उन्नती आहे