तुळशी विवाह चे महत्त्व || तुळशीचा विवाह कसा साजरा करावा? || त्रिपुरी पौर्णिमा कथा.

तुळशी विवाह

कार्तिक शुद्ध एकादशीपासून पुढचे चार दिवस तुळशीचा श्रीकृष्णाशी किंवा शाळीग्रामशी विवाह लावला जातो. तुळशीला ‘विष्णुप्रिया’ असेही म्हटले जाते. तुळशीचा विवाह कार्तिक शुद्ध द्वादशी कार्तिक शुद्ध पौर्णिमा या कालावधीपर्यंत केला जातो.

तुळशीचा विवाह कसा साजरा करावा?

तुळशीच्या विवाहाकरिता तीन महिने आधीच तुळशी वृंदावनातल्या तुळशीच्या रोपाला नियमित पाणी घालून तिची पूजा करावी. तुळशीचे रोप हे मोठे असावे. अगदी छोट्या तुळशीच्या रोपाचा विवाह करू नये. तुळशी वृंदावन नसेल तर रोप आणून कुंडीत लावावे. तुळशीचा विवाह करताना तुळशीभोवती चार ऊस एकत्र करून त्याचा मांडव केला जातो. तुळशीवृंदावनामध्ये एका वाटीत बाळकृष्ण किंवा शाळिग्राम किंवा विष्णूची मूर्ती ठेवली जाते. मूर्तीवर फुलाने पंचामृत शिंपडले जाते. गंध लावले जाते. तुळशीला हळदीकुंकू व अक्षता वाहून माळावस्त्र वाहिले जाते तसेच कृष्णालाही माळावस्त्र वाहिले जाते. तुळशीवर एखादे छान रेशमी वस्त्र पांघरले जाते. तसेच छोटेसे पिवळे वस्त्र कृष्णावर पांघरले जाते. तुळशी वृंदावनात बोरे, ऊस हे नैवेद्याला ठेवतात. लाडू, करंज्या याचाही नैवेद्य तुळशी विवाहात दाखवला जातो. त्यांची पंचोपचारी साग्रसंगीत पूजा झाल्यावर आरती करून नंतर त्यांच्यामध्ये आंतरपाट धरून मंगलाष्टका म्हटल्या जातात. काही ठिकाणी गुरुजी बोलावून मांडव घालून तुळशीविवाह दणक्यात साजरा केला जातो. संध्याकाळी बायकांना हळदी-कुंकवाला बोलावून चिवडा, करंजी, लाडू असे फराळाचे दिले जाते. अशा तन्हेने तुळशीचे लग्न दणक्यात साजरा करून सनई-चौघडे वाजविले जातात.

तुळशीचे महत्त्व

भारतीय संस्कृतीत तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशी ही वृंदावनात राहते आणि ती कृष्णाला अतिशय परमप्रिय आहे. ‘जिथे तुळस तिथे भगवंताचे वृंदावन नांदते’ असे म्हटले जाते. तुळशीच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे वास्तव्य असते. तुळशीच्या पानाच्या मध्यभागी केशव व देठात शिवाचे वास्तव्य असते. फुलांत सरस्वती गायत्री चंद्रिका इंद्रायणी इ. देवता असून फांद्यामध्ये इंद्र, अग्नी, शमन, वरुण, नैर्ऋत्य, पवन आणि कुबेर राहतात, तर सूर्य व इतर ग्रहदेवता, देवमुनी, ऋषी, विद्याधर, गंधर्व, सिद्ध अप्सरा या सिद्धदेवता तिच्या आश्रयासाठी येत असतात. ऋग्वेद हे तिचे शरीर, यजुर्वेद हे तिचे मन, अथर्ववेद तिचा प्राण आहे असे मानले जाते. तुळशीची मंजिरी ही सर्व देवांची प्रतिनिधी मानली जाते. देवाला एखादा नैवेद्य दाखवायचा असेल किंवा एखादी वस्तू देवाला अर्पण करायची असेल तर त्यावर तुळशीचे पान ठेवून मग देवाला अर्पण केले जाते.

त्रिपुरी पौर्णिमा 

कार्तिक शुद्ध पौर्णिमेला शिव व विष्णू यांची मध्यरात्री भेट होते म्हणून बेल व तुळस वाहून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी घरोघरी, अंगणात, मंदिरात दिवे लावण्याची पद्धत आहे. कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते. विविध देवस्थानातील दीपस्तंभ असतात ते या वेळेला प्रज्वलित केले जातात. या दीपोत्सवाला ‘त्रिपूर पाजळणे’ असे म्हणतात. या दिवशी त्रिपूरवात काही जणांकडे लावली जाते. त्रिपूर वात ही पाच ते सहा दिवस तुपात मिजवून ठेवावी. त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी ही वात प्रज्ज्वलित करावी व देवापुढे नामस्मरण करावे.

त्रिपुरी पौर्णिमा कथा

तारकासुर नावाच्या असुराला तीन पुत्र होते. त्यांचे नाव तारक्ष, कमलाक्ष, विद्युनमानी. तारकासुराने त्यांच्यासाठी तीन पुरे म्हणजेच गावे वसविली होती व त्यांना बजावले होते की, देवाच्या वाटेला जाऊ नका, त्यांना त्रास देऊ नका. पण त्यांनी ऐकले नाही. त्यांनी देवांना त्रास देण्यास सुरुवात केली. श्री शंकरांनी त्यांचा नाश करून त्रिपुराची होळी केली. त्रिपूर म्हणजे त्या तीन गावांची होळी केली. अशा प्रकारे चांगल्या वृत्तीनी वाईट वृत्तीवर मिळवलेला विजय म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमा होय. विजय साजरा करण्याकरिता त्रिपुरी दीपोत्सवाची सुरुवात झाली. कार्तिक पौर्णिमेस विशेषतः शिवमंदिरातून त्रिपुर वाती लावल्या जातात.

महाराष्ट्रात सर्व मंदिरे दिव्यांनी उजळून टाकतात. सगळीकडे दिवे बघून देवच दिवाळी साजरी करीत आहेत असे वाटते. त्रिपुरी पौर्णिमेला मोठी दिवाळी किंवा देव दिवाळी असेही म्हटले जाते. जे चांगले आहे ते रुजवावे वाईट तेवढे काढून टाकावे हाच खरा त्रिपुरी पौणिमेचा संदेश आहे.

वैकुंठ चतुर्दशी

त्रिपुरी पौर्णिमेचा आधीचा दिवस म्हणजेच कार्तिक चतुर्दशी. यालाच ‘वैकुंठ चतुर्दशी’ असे म्हटले जाते. चातुर्मासामध्ये विष्णू निद्रावस्थेत असतात या काळात संपूर्ण विश्वाचा कारभार त्यांनी शंकराकडे सोपविलेला असतो असे म्हणतात. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर पुन्हा विष्णूकडे येऊन त्यांना विश्वाचा कारभार परत करतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात. या दिवशी हरिहर भेट म्हणजे विष्णू व शंकराची भेट होते असे मानले जाते आणि या दिवशी चातुर्मासाची सांगता होते. या दिवशी शंकराची १०८ नावे घेऊन तसेच विष्णूची सहस्र नावे घेऊन बेल आणि तुळस यांनी त्याची पूजा केली जाते. अनेक देवळात व घराघरांत या दिवशी विष्णू आणि शंकराची पूजा केली जाते.

वैकुंठ चतुर्दशी कथा

एकदा भगवान विष्णू यांनी काशी येथे महादेवाला एक हजार कमळ वाहण्याचा संकल्प केला होता. त्या वेळी महादेवांनी भगवान विष्णूची परीक्षा घेण्याकरिता या कमळातून एक कमळ कमी केले त्यावर भगवान विष्णू यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला. विष्णूची भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि विष्णूला वर दिला कार्तिक मासात येणारी चतुर्दशी ही वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाईल आणि जो कोणी हे व्रत करीन त्याला वैकुंठ प्राप्त होईल. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. भगवान विष्णूला चंदन, फुले, दूध, दही, पंचामृताने स्नान घातले जाते. अभिषेक केला जातो. विष्णूचे नामस्मरण करून त्याला गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवून नंतर उपवास सोडला जातो. याच दिवशी विष्णूसह शिवाची पूजा केली जाते.

पांडव पंचमी

कार्तिक शुद्ध पंचमी म्हणजे ‘पांडव पंचमी’ होय. पांडव आणि कौरव यांच्या युद्धात पांडवाचा विजय झाला. पांडवाचा विजय दिवस म्हणजे पांडव पंचमी होय. कार्तिक शुद्ध पंचमीला पांडव

अज्ञातवासातून प्रकट झाले. पांडवपंचमी म्हणजे पांडवांची पूजा करून त्यांच्यात असलेले शौर्य, वीरता, आदर्श गुणांचे पूजन करण्याची परंपरा आपल्याकडे प्रचलित झाली.

भैरवनाथ जयंती

कार्तिक कृष्ण अष्टमीला ‘कालाष्टमी’ असे म्हणतात. या दिवशी ‘कालभैरव जयंती’ साजरी केली जाते. भगवान शंकराच्या रौद्र अशा अवताराची आज निर्मिती झाली.

भैरवनाथ कथा

एकदा ब्रह्मदेवाने महादेवाच्या रूपाची खूप चेष्टा केली आणि महादेवांनी त्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही ते रागावले नाही; पण त्याच क्षणी त्यांच्या शरीरातून एक प्रचंड अशी जटाधारी अक्राळविक्राळ काया निर्माण झाली म्हणजेच भैरवनाथ प्रकट झाले. त्यांच्या हातात दंड होता. त्याचे अक्राळविक्राळ रूप पाहून सृष्टी निर्माते घाबरून गेले. शेवटी महादेवांच्या मध्यस्थीने तो भैरव शांत झाला. भैरव स्थूल आहे. त्याच्या पीळदार मिश्या आहेत त्याच्या हातात डमरू, दंड, त्रिशूळ, अमृतपात्र आहे. त्याचे वाहन काळे श्वान तसेच नागसुद्धा आहे. त्याला चमेलीचे फुले आवडतात. काही ठिकाणी याला मांसाहाराचा नैवेद्य दाखविला जातो. गावात ग्रामदेवता म्हणून भैरवनाथाची पूजा केली जाते. जरी भैरवनाथाचे वर्णन उग्र आणि विचित्र वाटते तरी कलियुग भयमुक्त करणारा व आपल्या पाठीशी उभा राहणारा असा हा भैरवनाथ आहे.

कार्तिक स्नान

कार्तिक शुद्ध दशमी/एकादशी अथवा पौर्णिमेला विष्णूचे नामस्मरण करत एखाद्या तीर्थ स्नानावर जाऊन कार्तिक स्नान केले जाते.

Leave a Comment