संत गाडगेबाबा यांची माहिती || बालपण || संत गाडगेबाबा यांचे कार्य || गाडगेबाबांची पूर्ण माहिती व निबंध

गाडगे बाबा

भारत देशात अनेक संत होऊन गेले. त्यातील एक प्रमुख संत गाडगे बाबा होत. गाडगे बाबा म्हटले की, डोळ्यासमोर फाटके-तुटके वस्त्रे ल्यायलेली, हातात खराटा घेतलेली व्यक्ती येते. गाडगे बाबा हे स्वतःला अशिक्षित, अडाणी समजत असले तरी त्यांच्याकडे फार मोठी ज्ञानाची खाण होती. त्यांचे जीवन त्या काळात तसे हलाखीचे गेले.

बालपण

गाडगे बाबांचा जन्म हा स्वातंत्र्यपूर्व काळात झाला. गाडगे बाबा हे त्यांचे टोपण नाव होते. श्री. डेबूजी झिंगराजी हे त्यांचे खरे नाव. इ. स. १८७६ विदर्भातील कोते या खेडेगावात त्यांचा जन्म झाला. बाबांचा जन्म मागासलेल्या परीट घराण्यात झाला होता. जन्मापासूनच त्यांच्या घरात खूप गरीबी होती.

बाबांच्या आईने बाबांवर खूप चांगले संस्कार केले. त्यांची आई त्यांना जात्यावरच्या ओव्या शिकवित असे. थोरा मोठ्यांच्या गोष्टी सांगत असे.

बाबांचे आई-वडिल सावकाराकडे काम करत. सावकाराकडून थोडाफार पैसा मिळत असे त्यातूनच बाबांचे वडील आपला चरितार्थ चालवत असत. घरात खूप कर्ज झाले होते. ते कसे फेडायचे हाच बाबांच्या आई वडिलांपुढे प्रश्न होता.

वडिलांना थोडीफार आर्थिक मदत करायला पाहिजे असे बाबांना वाटू लागले. त्यांनी शेतात कामे मिळवली. गुराख्याचे काम मिळवले. दिवसभर ते रानात गुरे हाकीत असत, शेतातली कामे करीत. आईलाही घरी स्वच्छतेसाठी मदत करीत. लहानपणापासून त्यांना स्वच्छतेची आवड होती. घरात त्यांना कचरा पडलेला आजिबात आवडत नसायचा. ते स्वतः हातात झाडू घेऊन घर स्वच्छ करीत.

बाबांच्या गावातल्या देवळात रोज रात्री शेतातली कामे करून झाली की, रात्रीच्या वेळी गावकरी कीर्तन करीत. बाबा पण त्या कीर्तनाला रोज जात. त्यांना कीर्तनातील अभंग, ओव्या त्यांना खूप आवडत. कीर्तनाची गोडी बाबांना अधिकाधिक वाटू लागली.

मामाच्या शेतात काम..

बाबा आठ वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर ते मामाच्या शेतात काम करू लागले. मामाच्या शेतात त्यांनी खूप मन लावून काम केले. परिश्रम करून मामाचा मळा फुलवला. रोज पहाटेपासून रात्रीपर्यंत ते शेतात काम करायचे. परिश्रम केले की आपला कसा फायदा होतो नि मानसिक समाधान कसे मिळते याचा अनुभव त्यांना लहानपणीच आला.

लग्न झाले पण…..

दिवसा जेव्हा बाबा रानात गुरे घेऊन जात तेव्हा एकीकडे गायी चरत व दुसरीकडे बाबा एखाद्या झाडाखाली बसून अभंग गुणगुणत, कीर्तनातल्या ओव्या म्हणत. हळूहळू बाबा मोठे होऊ लागले. त्यांच्या आई वडिलांना घरात सून यावी असे वाटू लागले आणि खरोखर एक दिवस त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या लग्नाचा घाट घातला. आई वडिलांच्या समाधानासाठी बाबांनी लग्न केले पण त्यांचे संसारात मन रमत नव्हते. त्यांना कीर्तनाची आणि परमेश्वरभेटीचीच ओढ लागली होती. गावातल्या लोकांसाठी काहीतरी करावे असे त्यांना सारखे वाटू लागले.

त्यांना संसारात स्वारस्य नव्हते. आईवडिलांनी त्यांचे लग्न केले खरे पण त्यांनी ते केवळ आई वडिलांचे मन मोडायचे नाही म्हणूनच केले. पण यामुळे झाले काय तर एक दिवस ते घरातून पळून गेले. घरातून पळून जाऊन ते रानोवनी भटकू लागले. परमात्म्याचा शोध घेऊ लागले. बाबांची तुलना गौतमबुद्धांशी केली जाते कारण ज्याप्रमाणे गौतमबुध्दाने साऱ्या सुखांचा त्याग करून अज्ञातवास पत्करला होता त्याप्रमाणे गाडगे महाराजांनीही एके दिवशी रात्रीच्या वेळी सर्वस्वाचा त्याग करून बारा वर्षे अज्ञातवास पत्करला.

तेजस्वी योगीची भेट

अशा प्रकारे जीवन जगत असता, एक जटाधारी तेजस्वी योगी त्यांना भेटला. त्याने बाबांना प्रसाद दिला. त्याच्या मनीची इच्छा ओळखली व त्यांना प्रसाद देऊन, रात्रभर स्मशानात बसवून आपली पारमार्थिक साधना दिली.

गाडगेमहाराजांनीही नंतर आपले तन, मन, धन जनसेवेत वेचण्यासाठी कठोर तप आचरले. या काळात यांनी कदान्न सेवन, विध्या पांघरून, मस्तकी गाडगे धारण करून देहश्रमाची पराकाष्ठा केली. डेबुजी आता गाडगेबाबा म्हणून ओळखले जाऊ लागले.

डेबुजी आता गाडगेमहाराज झाले

गाडगेमहाराज गावागावात जाऊन जनसेवा, ग्रामसेवा करू लागले. ग्रामस्वच्छतेचे जणू त्यांनी व्रतच स्विकारले होते.

आता ते मंदिरात जाऊन भजन कीर्तन करू लागले, त्यांच्या कीर्तनातील महत्वाचे पालुपद असे ‘गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला,’ गावकऱ्यांच्यात ते रमू लागले. कळत नकळतपणे गावकऱ्यांना उपदेश करू लागले, ‘हात फिरे तिथे लक्ष्मी वसे’ हा उपदेश लोकांच्या मनावर ठसवू लागले, लोकांना स्वच्छतेचा महिमा पटवून देऊ लागले. हळूहळू त्यांनी लोकसेवेला वाहून घेतले. ते स्वतः गाव स्वच्छतेला सुरवात करीत. त्यांच्या हाती कायम खराटा असे. त्या काळात त्यांनी लोकांवर शिक्षणाचेही महत्व बिंबवले.

पयली लाकडं फोड, मग पतुर वाच !

एकदा काय झालं, गाडगे बाबा रस्त्याने जात होते. वाटेत त्यांना जंगल लागले. त्या जंगलातून ते एका गावात पोहोचले. गावात पोहोचताच त्यांना एक माणूस लाकडे फोडताना दिसला. तेवढ्यात त्या गावात पोस्टमन पत्र घेऊन आला. लाकूड फोडणारा माणूस धावतच पत्र घ्यायला गेला.

त्या माणसाच्या मालकाने ते पाहिले. त्याबरोबर तो त्याला म्हणाला, ‘पयली लाकडं फोड, मग पतुर वाच ! मोठा आलाय पतुर वाचणारा.

मालकाचे हे शब्द गाडगेबाबांनी ऐकले आणि त्यांना राग आला. ‘बिचारा तो माणूस, आपलंच काहीतरी पत्र आलं असावं म्हणून तो धावत गेला उत्सुकतेने तर मालकाने त्याची निराशा केली.’

म्हणून बाबा धावतच त्या माणसाकडे गेले आणि म्हणाले, ‘आन हिकडं कुऱ्हाड, म्याच फुडतो लाकडं.’ असं म्हणून गाडगेबाबांनी कुन्हाडीने लाकडावर धडाधडा घाव घातले आणि त्या माणसाला गाडगेबाबा म्हणाले, ‘वाच बरं पत्र. सांग बरं, पत्रात काय लिवलय ते?’

पण गाडगे बाबांच्या या प्रश्नावर तो माणूस निरूत्तर झाला आणि हताशपणे म्हणाला, ‘आरं बाबा, म्या शिकलो असतो तर ही पाळी असती का? म्या हो पतुर आमच्या मालकाकडूनच वाचून घेणार की.’

त्याचे ही परस्वाधिनता पाहून आणि ऐकून गाडगेबाबांनी त्याला उपदेश केला की, ‘आरं बाबा, तू शिकला नायस ही फार मोठ्ठडी चूक केलीस. आता इथून फुडं तरी शाणा हो. उपाशी रहा. पर तुझ्या पोरास्नी तरी शिक्ष्यान दे. शिक्षान नाही तर आयुष्यात लई हाल होत्यात बघ. तुला वाचायला येत असतं तर तुला कशाला मालकावर अवलंबून रहावे लागले असते. तूच ते पतुर वाचलं असतं नवं ? तू जी न शिकण्याची आयुष्यात चूक केलीस ती आपल्या पोरांना नर्ग करू देऊस.’

असं हे शिक्षणाचं महत्व त्यांनी लाकूडतोड्याप्रमाणे अनेक लोकांना पटवून दिलं. त्यादिवसापासून हा प्रसंग गाडगेबाबा नेहमी त्यांच्या कीर्तनात सांगत आणि शिक्षणाचे महत्व पटवून देत. अनेक निरक्षर लोकांना यामुळे साक्षर होण्याची स्फूर्ती मिळू लागली.

माय बाप हो देव देवळात नाही !

गाडगेबाबा नेहमी म्हणत ‘माय बाप हो, तुमच्या गावात देव किती? आणि त्यातला खरा देव कोणता ? अहो, देऊळ बांधलं की मूर्त्या इकत आणाव्या लागतात. मंग असा देव भेटतो का इकत? आवं देव म्हणजे काय कांदे, बटाटे हायेत का मेथीची भाजी ? अन मला सांगा मूर्ती देवळात बसवली तर तिचं ती काय करू शकते का? तुम्हीच तिचं आंग धुता, तिला धोतर नेसवता, अन वर निवद दाखवता. ती मूर्ती निवद खाते का ओ? मूर्ती नाय खात, तर कुत्र खातं. मग सांगा बरं, देव देवळात हाय का?’

अशा प्रकारे आपल्या कीर्तनातून त्यांनी मूर्ती पूजेला विरोध दर्शवला. याउलट ते सांगायचे.. ‘देव हा माणसाच्या हृदयात असतो. तुमच्या माझ्या हृदयात पण तो आहे. फक्त त्याची हाक आपण ऐकायची असते आणि आपणही त्याला हाका मारायचे असते. लोकसेवा करून माणसातला देव जागा करा. मूर्तीपूजा हे थोतांड आहे’ असा प्रसार त्यांनी केला.

कष्टाची भाकर खा

आपल्या कीर्तनात ते नेहमी उपदेश करत, ‘काम करा. भीक मागू नका. लाचारीने जगू नका. कष्टाची भाकर खा. कोणाचे उपकार आपल्यावर होऊ देऊ नका.’ हे सांगताना ते नेहमी आपल्या लहानपणीचा किस्सा सांगत.

एकदा गाडगे बाबा लहानपणी काहीतरी कामासाठी सावकाराकडे गेले होते. त्यावेळी सावकार त्याच्या मुलाला टरबूज कापून देत होता. मुलगाही मजेने टरबूज खात होता. तेवढ्यात टरबुजाची एक फोड खाली पडली. त्याबरोबर सावकाराचा मुलगा ती घ्यायला वाकला.

लगेचच सावकार ओरडला, ‘अरे ती फोड नको उचलू. मी तुला दुसरी देतो.’ त्यावेळी गाडगेबाबा तिथेच उभे होते. सावकाराला वाटले की हा भिकाऱ्याचा पोर आशाळभूतपणे टरबूजासाठीच उभा आहे. सावकार बाबांना म्हणाला, ‘ए पोऱ्या उचल ती फोड. तुला टरबूज हवे आहे ना?’
ते ऐकून बाबांना कसेसेच झाले. मी गरीब, खालच्या जातीतला म्हणून मला धुळीत पडलेली टरबूजाची फोड चालणार आणि सावकाराच्या मुलाला तो श्रीरीब, खालच्या जातीतला माता कुठला न्याय ? खालच्या जातीतला म्हणान उष्ट-माष्ट खाऊ घालायची, भिकारी समजून लाचारात ती चा तुकडा घालायची सावकाराची पद्धत तानपणी त्यात आवडली नव्हती. त्यादिवशीपासून जातीभेदाविषयी त्यांच मन कटून उठले. जातीभेद न करण्याची शिकवण त्यांनी सतत

शिवाशीव का मानता?

गाडगे बाबा नेहमी म्हणत, ‘आपण सारे एक आहोत. एकाच परमेश्वराची लेकरे आहोत. मग ही शिवाशीव का मानतात ? खरंतर याला कारण आहे अस्वच्छता ! काही लोकांकडे स्वच्छता कमी असते म्हणून आपण त्यांना शिवत नाही’

ते आपल्या बांधवांना नेहमी सांगत, ‘अहो, स्वच्छता राखा.’ जे स्पृश्य-अस्पृश्यता पाळत, त्या कर्मठ लोकांवर त्यांनी त्या काळात हल्ला चढवला. ते म्हणत, ‘कुणी चार डोळ्याचा, दोन तोंडाचा, दोन नाकाचा असतो का? नाही ना. का कुणाच्या अंगात हिरवं-पिवळं-निळं रक्त असतया का? आवं सगळ्यांच रक्त लालचं हाय ना? मग भेदभाव कशाला?’

आगगाडीतला किस्सा

गाडगेबाबांची वेशभूषा अगदी भिकाऱ्यासारखी असे. ठिगळ लावलेले कपडे त्यांचे असायचे कारण कपडा फाटला तरी ते तो शिवून शिवून वापरत. काटकसर त्यांच्या अंगी होती. त्यांची दाढी नेहमी वाढलेली असे, हातात एखादा खापराचा वाडगा असे. तोच तुकडा कधीतरी डोक्यावर ते ठेवत नि भिक्षा मागत.

एकदा आगगाडीतून ते जात असताना एक घटना घडली. नाशिकला जाणाऱ्या रेल्वेत ते आगगाडीत ते बसले होते. थोड्या वेळाने ते निवांतपणे बाकाखाली झोपले. गाडगेबाबांनी तिकीट काढले नव्हते त्यामुळे त्यांनी जागा अडवली नाही.

तेवढ्यात गाडीत चेकर आला. ‘तिकीट कुठंय?’ असे तो सर्वांना विचारू लागला. त्याची नजर बाकाखाली झोपलेल्या गाडगे बाबांवर गेली. त्याला वाटलं, हा कोणीतरी भिकारी आहे. त्याने गाडगे बाबांचं बखुट धरलं आणि ओढतच त्यांना बाहेर काढलं आणि मागचापुढचा विचार न करता बुटाची लाथ त्यांना मारली आणि विचारलं. ‘तिकीट कुठंय ?’

त्यावर गाडगेबाबा म्हणाले, ‘न्हाई जी तिकीट.’

चेकर रागाने म्हणाला, ‘गाडी काय तुझ्या बापाची आहे?’

त्यावर शांतपणे गाडगेबाबा म्हणाले, ‘आपनचं तर माझे माय-बाप.’

‘कुठ जायचयं ?’ तिकीट चेकरने विचारले. ‘नाशकाला.’ गाडगेबाबांनी उत्तर दिले.

‘बिन तिकीटाचं जायचंय वाटतं नाशकाला? उतर खाली, फुकट्या.’

त्यावर गाडगेबाबा शांतपणे म्हणाले, ‘फुकट्या नाय मी. इथवर आलो की लाथा खात. मगाशी एक लाथ घातली, आता नाशकापर्यंत आनखी एक घाला म्हणजे झालं.’ हे ऐकून तिकीट चेकर चक्रावला. त्याला काय बोलावे सुचेना.

तेवढ्यात गाडगेबाबांचा कोणी भक्त धावत आला आणि म्हणाला, ‘अहो, हे गाडगे बाबा आहेत. मी भरतो त्यांचं तिकीट.’ गाडगेबाबांचे नाव कळताच तिकीट चेकरने त्यांची क्षमा मागितली आणि तो तिथून निघून गेला.

पितरांना पानी पाजतुया

बाबांचा अंधश्रध्दांवर विश्वास नसे. ते लोकांना नेहमी सांगत की अंधश्रध्देपासून दूर रहा. एकदा काय झालं गाडगेबाबा रस्त्याने चालले होते. तितक्यात त्यांना एक माणूस गंगा किनारी आंघोळ करून पाणी ओंजळीने फेकताना दिसला. तेव्हा त्यांनी त्याला विचारले, ‘हे काय करून राह्यलास बाबा?’

तेव्हा तो म्हणाला, ‘स्वर्गात माझी पितर हायत. त्यांना पानी पाजतुया.’

मग काय ! गाडगेबाबासुद्धा गंगेच्या पात्रात उभे राहिले आणि ऑजळीने पाणी फेकू लागले.

हे बघून काही लोक जमा झाले आणि त्यांना म्हणाले, ‘बाबा, बाबा हे काय करताय?’ त्यावर गाडगेबाबा हसत म्हणाले, ‘माज्या शेताले पानी घालतोय.’

तेव्हा लोक आणखी अचंबित झाले आणि म्हणाले, ‘अहो, पण शैत कुठयं तुमचं ?’

तेव्हा गाडगेबाबांनी उत्तर दिले, ‘शेत वय. लाम हाय. तिकडं व्हराडात.’

त्यावर लोकांनी विचारले, ‘अहो, पण शेताला पाणी कसं पोहोचणार हितून ?’

तेव्हा बाबा म्हणाले, ‘मला सांगा हेच्या पितरांना स्वर्गात हितून पानी पोचतया मंग माझ्या शेताले नको का पोचायला?’

गाडगेबाबांचे हे उत्तर ऐकून सारेजण गप्प झाले. जो माणूस गंगेच्या पात्रातून ऑजळीने आपल्या पितरांना पाणी पाजत होता त्यालाही आपली चूक कळली. तो धावतच येऊन गाडगे बाबांच्या पाया पडला. अशा एक ना अनेक अंधश्रध्दा बाबांनी खोडून काढल्या. आपल्या कीर्तनातून हिंदू धर्मातील कर्मकांडावर कडाडून टीका केली. जनजागृती केली.

लेकरू व्हवू दे हिला भवानी आई रोडगा व्हाईन तुला’

त्या काळातील अशिक्षित लोकांना उपदेश करताना गाडगेबाबांनी नवस, बळी अशा प्रथांवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणत, ‘आवं देवाला नवस कशापायी करता तुमी ? देवाचं नाव अन् तुमचं गाव. देव काय खात नाय पन त्याच नाव करून तुमी मातुर खाता बकरं न् कोंबडं ! लेकरासाठी नवस करता, कोंबडं कापता, मेंढरू कापता, ही प्राणीहत्या थांबवा बघू. आवं त्या परीस एखादं बकरू न्हाय तर कोंबडं देवाला सोडून का देत न्हाईत. गरीबाला रोडगा द्या. त्याच्यातला देव खाईल. तवा नवससायास करू नका. कोंबड्या बकऱ्यांचं बळी देऊ नका. त्यापरीस मुक्या प्राण्यांची सेवा करा.’

बाबांचा स्वच्छतेचा महामंत्र

गाडगेबाबांचे स्वच्छतेचे शस्त्र होते खराटा. कुठेही गेले तरी ते अस्वच्छता, घाण बघून गप्प बसत नसत. मला कोण काय म्हणेल? मी कसे झाडू ? लोक काय म्हणतील? याचा विचार न करता ते स्वतः परिसर झाडून स्वच्छ करत. हे बघून त्यांचे अनेक कार्यकर्ते देखील या कामाला लागत. गाडगेबाबांनी सर्वांना स्वच्छतेचा महामंत्र दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट

गाडगेबाबांची कीर्ती सर्वदूर पसरत चालली होती. गाडगेबाबांची कीर्तनं खूप रंगत. प्रचंड जनसमुदाय जमा होई. एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या कीर्तनाला आले होते.

कीर्तन संपल्यानंतर त्यांनी बाबांची भेट घेतली. ते बाबांना म्हणाले, ‘मला एक सल्ला पाहिजे आपला.’

त्यावर बाबा म्हणाले, ‘म्या अडाणी मानूस, मला काय उमगणार सल्ला द्यायला? तरीबी इतकं सांगतो की तुमी दोन रस्ते वगळा बुआ.’

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कळेना की, बाबा काय म्हणताहेत. त्यावर आंबेडकर म्हणाले, ‘म्हणजे?’

‘आवं तुमी ख्रिश्चन बनू नका. अन् मुसलमान बी व्हऊ नका. दोनी वाटांनी सत्यानास व्हईल. अन् देशाला धोका बी व्हईल.

त्यावर बाबासाहेबांनी लगेचच गाडगे बाबांना वचन दिले की, ‘मी कधीच ख्रिश्चन किंवा मुसलमान होणार नाही. वाटल्यास बौद्ध होईन आणि माझ्या बांधवांना बौद्ध धर्माची वाट दाखवीन !’

हे ऐकून गाडगे बाबांची कान तृप्त झाले. गाडगेबाबांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर नितांत श्रद्धा होती. बाबासाहेबांचे ज्यावेळी महानिर्वाण झाले. तेव्हा गाडगेबाबा महारानी डॉ. बाबासाहेब सांग लाई इलाज केले पन न्हाय वाचला.’

त्याच वेळी गाडगेबाबांना आपली वेळ आल्याचेही दिसले. शेवटच्या कीर्तनापूर्वीच ते जमलेल्या अफाट जनसमुदायाला म्हणाले, ‘काय चुकलं माकलं असल तर माफ करा. आता बाबासाहेबांच्या मागोमाग आमाला बी बोलावनं आलं हाय. तवा आमी जातो आमच्या गावा. पन येक सांगतो, म्या गेलो तरी तुमी रडू नका. ऐसे गेले कोट्यानु कोटी काय रडू एकासाठी’ हे लक्षात ठेवा.’

गाडगेमहाराजांची थोरवी

अनेक प्रकारचे उपदेश करीतच गाडगेमहाराजांचे उभे आयुष्य गेले. उभ्या महाराष्ट्रात लोकजीवन उजळण्यासाठी हातीच्या खराट्याने गावाचे रस्ते झाडीत गेले आणि विवेकाच्या खराट्याने लोकांची मने स्वच्छ करीत गेले.

कीर्तनाद्वारे शिक्षणाचे महत्त्व जनतेस पटवून देऊन लोकजागृती साधणारे हे एक फिरते विद्यापीठ होते. संत तुकारामाचे अभंग, या निरक्षर संताच्या तोंडपाठ होते. त्यांनी समाजकार्यही खूप केले. नाशिक, पंढरपूर, आळंदी व देहू येथे धर्मशाळा बांधल्या व अनेक भाविकांची रहाण्याची सोय केली. अनेक ठिकाणी अन्नछत्रे उभारण्यासही प्रोत्साहन दिले.

जनमानसातील मानसिक रोग नष्ट करण्याचेही महान कार्य त्यांनी केले. जातीभेदापासून लोकांपासून दूर केले. स्पृश्य- अस्पृश्य हे थोतांड आहे हे जनतेला पटवून दिले. सामान्यांचे ते तारणहारच ठरले आणि इ. स. १९५६ साली अमरावती येथे आपला देह ठेवला. देहरुपाने ते गेले पण अजरामर होऊनच.