स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्वातंत्र्य चळवळीसाठी छुपा लढा || अभिनव भारत ही गुप्त संस्था सुरू || स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती.

स्वातंत्र्य चळवळीसाठी छुपा लढा

पुण्याला येताच विनायकला नवनवे मित्र मिळाले आणि स्वातंत्र चळवळीसाठी यांचा छुपा लढा सुरू झाला. ‘आपण परदेशी कापड जाळून टाकले पाहिजे. परदेशी कापड हे नुसते कापड नाही, ते इंग्रजांचे प्रतीक आहे. त्यांच्या विजयाचे चिन्ह आहे. आपल्या गुलामगिरीचे प्रतिक आहे. चौकाचौकांतून विदेशी कापड जाळले पाहिजे, त्याची होळी केली पाहिजे. ज्या होळ्यांच्या प्रकाशात आमची घरे झगमगून निघणार आहेत आणि या महाकाय होळ्या पाहून इंग्रजांच्या हृदयात धडकी भरेल !’ असे भाषण विनायकने आपल्या मित्रमंडळींना ऐकवले.

अभिनव भारत’ गुप्त संस्था सुरू

पुण्यातही त्यांनी मित्रमेळा सुरू केला आणि ‘अभिनव भारत’ नावाची गुप्त संस्था स्थापन केली. बंगालच्या फाळणीमुळे आणि लॉर्ड कर्झनच्या दडपशाहीमुळे देशातील वातावरण तप्त झाले होते. हे पाहून ते म्हणाले, ‘नुसत्या सभा आणि तीच ती व्याख्याने आता पुरे झाली. आता कृती हवी आहे. इंग्रजांना धडा शिकवणारी कृती. शंभर व्याख्यानांनी जे काम होत नाही ते काम तेजस्वी अशा एकाच कृतीने होईल.’

लोकमान्य टिळकांचा आशीर्वाद

एक दिवस विनायकराव आणि त्यांचे तरुण मित्र लोकमान्य टिळकांना जाऊन भेटले. विनायकरावांनी आपली योजना टिळकांपुढे मांडली. टिळक म्हणाले, ‘योजना चांगली आहे. पण होळी करायची तर ती नुसती दहा-पाच कपड्यांची नको. खूप मोठा ढीग जमवा, म्हणजे त्याचा परिणाम होईल. नाहीतर नुसताच पोरखेळ होईल. तुमच्या कल्पनेचे हसू होऊ देऊ नका.’

टिळकांचा आशीर्वाद मिळाल्याबरोबर त्या सगळ्या तरुणांमध्ये नवा आवेष, नवा उत्साह संचारला. त्यांना स्वातंत्र्य लढ्याची नवी दिशा मिळाली. तहानभूक विसरून ते सगळ्या पुण्यात विदेशी कपडे गोळा करत हिंडले. संध्याकाळपर्यंत भला मोठा ढीग झाला. भर चौकात तो ढीग पेटविण्यात आला. त्या प्रसंगी तेथे लो. टिळक, शिवरामपंत परांजपे आदि वक्त्यांची जोषपूर्ण भाषणे झाली. त्या तरुणांचा नेता विनायक याचेही भाषण लोकांना थक्क करून गेले.

देशभर विदेशी कपड्यांचा होळ्या पेटल्या

त्याचवेळी नाशिकलाही तशीच होळी झाली. इतर अनेक ठिकाणीही लहान-मोठ्या होळ्या झाल्या. हा हा म्हणता वातावरण तापू लागले. इंग्रज सरकारचे लक्ष वेधले गेले. विनायकला फग्युर्सन कॉलेजच्या अधिकाऱ्याने दहा रुपये दंड ठोठावला. वसतिगृह सोडून जायचा आदेश दिला.

या कापडाच्या होळ्यांमधून हजारो लोकांच्या मनात इंग्रजाविषयी असलेला द्वेष, राग प्रगट झाला. तरुणांच्या मनात क्रांतीची ज्वाला भडकली. चमकू लागली. इंग्रजांना येथून हाकलले पाहिजे असा जो तो विचार करू लागला

स्वातंत्र्य देवीचे स्तोत्र

‘स्वतंत्रतेचे स्तोत्र’ ही सावरकरांनी रचलेली त्या काळातील एक महत्वाची कविता आहे. ही कविता म्हणजे जणू सावरकरांच्या जीवनाचे सर्वस्व म्हणावे लागेल. आजही प्रत्येक देशभक्ताच्या तोंडी हेच काव्य आढळते. मातृभूमीचे स्वातंत्र्य हाच खरा आनंद, तेच खरे ध्येय आणि तोच खरा मार्ग. हेच या कवितेत सांगितले आहे.

जयोऽस्तु ते श्रीमहन्मंगले । शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवति । त्वामहं यशोयुतां वंदे ।।

आपल्या जीवनाचा मार्ग सांगताना सावरकर म्हणतात…

तुजसाठी मरण ते जनन
तुजवीन जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण

अशा प्रकारे विनायकरावांचे कॉलेजमधील जीवन हे राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेले होते.

लेखणीचे वर्चस्व

त्या काळात स्वातंत्र्यासाठी कार्य करताना विनायकरावांनी आपली लेखणी कधीच स्वस्थ बसू दिली नाही. त्यांनी हजारो पुस्तके वाचली आणि शेकडो लेख लिहिले. ‘केसरी’ आणि ‘काळ’ या वर्तमानपत्रांतही ते लिहित असत. गावोगावी जाऊन लोकजागृतीची आणि देशभक्तीची व्याख्यानेही देत असत. कॉलेजच्या नाट्य साहित्य, वक्तृत्व साऱ्याच क्षेत्रात त्यांनी गरूड भरारी मारली.

वकीलीसाठी मुंबईला

पहिल्यापासूनच इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी बॅरिस्टर व्हायचे सावरकरांचे स्वप्न होते. त्यामुळे त्यांनी अभ्यासही चांगला केला. २१ डिसेंबर १९०५ रोजी ते बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. वकिलीचे पहिले वर्ष त्यांनी आधीच पदरात पाडून घेतले होते. दुसऱ्या वर्षासाठी ते मुंबईला राहिले. मुंबईच्या एक वर्षाच्या मुक्कामात ‘बिहारी’ साप्ताहिकात त्यांनी देशभक्तीपर खूप लेखन केले. अनेक उघड कामांबरोबर स्वातंत्र्य प्राप्तीसाठी गुप्त कारवायाही चालूच ठेवल्या. ‘अभिनव भारत’ चे सभासद वाढले. शहराशहरात इंग्रजाविरूद्ध सावरकर निखारे पेरीत होते.

त्याच वेळी वर्तमानपत्रात एक निवेदन प्रसिद्ध झाले. त्यामध्ये शिष्यवृत्त्या घोषित केल्या होत्या. ती शिष्यवृत्ती विनायकराव सावरकरांना मिळाली. सावरकरांच्या विनंतीपत्राबरोबर लोकमान्य टिळकांचे पत्र होते.

बॅरिस्टरसाठी इंग्लडला प्रयाण

बॅरिस्टर होण्यासाठी विनायकराव इंग्लंडला जायला निघाले. तो दिवस होता ९ जून १९०६. ते ‘पर्शिया’ जहाजावर चढले. त्यावेळी आपल्या प्रिय मातृभूमीपासून दूर जाणार म्हणून त्यांना वाईट वाटले. जहाजावर तिथे श्री. रमेशचंद्र दत्त व हरनामसिंग यांना देशभक्तीची दीक्षा दिली.

३ जुलै १९०६ रोजी सावरकर लंडनला पोहोचले. तिथे त्यांनी मॅझिनी याच्या चरित्राचा व लेखांचा मराठी जनतेला परिचय करून दिला. मॅझिनीच्या चरित्राची प्रस्तावना खूप प्रक्षोभक होती. इंग्रज सरकारला त्या पुस्तकाची धास्ती वाटली. ते पुस्तक इंग्रज सरकारने जप्त केले पण महाराष्ट्रातील शेकडो तरुणांनी ती सव्वीस पानांची प्रस्तावना पाठ केली.

त्यांनी ‘फ्री इंडिया सोसायटी’ स्थापन केली. तिचे कार्यक्रम होऊ लागले.

१० मे १९०७ रोजी १८५७ च्या क्रांतियुद्धाला पन्नास वर्षे होणार होती. १८५७ च्या त्या पहिल्या भारतीय क्रांतियुद्धावर त्यांनी मराठीत एक मोठा ग्रंथ लिहिला व तो हिंदुस्थानात पाठविला. त्याचे इंग्रजी भाषांतर केले. तो हॉलंडमध्ये छापला गेला. त्याच्या प्रती बंगाल, पंजाब, आंध्र मध्ये पोहोचल्या. क्रांतिकारकांची ती भगवद्‌गीता ठरली.

लंडनमध्ये त्यांनी क्रांतीचे मोठे केंद्र उघडले. लाल वर्मा, हेमचंद्र दास, सेनापती बापट, व्यंकट सुब्रमण्यम् अय्यर, सुखसागर दत्त, निरंजन पाल, मिस्टर खान, गोविंद मेनन, डॉ. राजन, मदनलाल धिंग्रा हे सामिल झाले.

नेमबाजी, पिस्तूल-बंदूक चालविणे, बाँबगोळे तयार करणे, या शिक्षणांसाठी अनेकांना परदेशी पाठविण्यात आले. अनेकांनी रशियन क्रांतिकारांशी संबंध जोडले.

भारतात येणाऱ्या तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी इंग्रजांनी नॅशनल इंडियन असोसिएशन या नावाची एक संस्था सुरू केली. ली वार्नर आणि कर्झन वायली विद्यार्थ्यांशी गोड बोलून, त्यांना मदत करून ते त्यांना आपलेसे करून ठेवीत. उद्देश हा की, क्रांतिकारकांच्या गटात त्यांनी जाऊ नये. पण-विनायकरावांनी यावर तोडगा काढला, मदनलाल धिंग्रा नावाच्या तरुणाला त्यांनी तयार केले. मजूर बनून तो इंग्लंडमध्ये पोहोचला. मदनलाल धिंग्रा अभिनव भारत या गुप्त संस्थेचा सभासद झाला.

कर्शन वायलीचा काटा काढण्यासाठी मदनलालने नेमबाजीचे शिक्षण सुरू केले.

९ जुलै १९०९ रोजी रात्री नॅशनल इंडियन असोसिएशनचा वाढदिवस थाटाने साजरा व्हायचा होता. पार्टी संपताच कर्शन बायली जायला उठला; तोच मदनलालने त्यांच्या चेहऱ्यावर गोळ्या झाडल्या. कर्झन वायली तिथल्या तिथे मरून पडला.

१७ ऑगस्ट १९०९ रोजी मदनलाल धिंग्रा आनंदाने फाशी गेला.

सावरकरांचे कार्य

सावरकर बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण झाले. पण त्यांना पदवी देण्याचे नाकारण्यात आले. लंडन पोलिसांकडे त्यांचे नाव अनेक ठिकाणाहून येत होते. विनायक सावरकर अनेक भानगडींच्या मुळाशी आहेत असे सगळीकडून निरोप येत होते.

हिंदुस्थानात झालेले बॉम्ब स्फोट, इंग्रज अधिकाऱ्यांवरचे खुनी हल्ले वगैरे गोष्टींमागे सावरकरांचाच हात आहे असे सरकारला वाटत होते. यातल्या ठळक घटना म्हणजे ११ एप्रिल १९०८ रोजी चंद्रनगरच्या मेजरवर बॉम्ब फेकण्यात आला. दि. ३० एप्रिल १९०८ रोजी जिल्हा मॅजिस्ट्रेटच्या अंगावर बाँब टाकण्याचा प्रयत्न झाला. बंगालमध्ये क्रांतीचा वणवा पेटला. २१ डिसेंबर १९०९ रोजी कान्हेरे नावाच्या तरुणाने जॅक्सनचा वध केला.

कोण होता हा कैदी ?

८ जुलै १९१०चा दिवस. फ्रान्समधील मार्सेलिस बंदर. त्या बंदरात एक आगबोट उभी होती. आगबोट थोडीशी बिघडली होती,

तेवढ्यात एकच आरोळी उठली. ‘पकडा पकडा, कैदी पळाला!’ सगळीजण दचकले. ‘तो पाहा, तो चालला आहे’ असे म्हणून एका अधिकाऱ्याने उडी मारली.

कैदी सप सप हात मारीत पाण्यातून चालला होता. पाणी कापीत होता, अंग खूप खरचटले होते. समुद्राचे खारट पाणी जखमेला झोंबत होते. पण त्याला पर्वा नव्हती. शेवटी किनारा जवळ आला, ‘हा तर उभा सुळका ! हा चढायचा ? थोडे त्या बाजूला जाऊ या.’ पुन्हा कैदी पोहू लागला.

धक्क्याच्या भागावरून कैदी चढू लागला. तो ती भिंत चढला एखाद्या घोरपडीसारखा. तो आता फ्रान्सच्या किनाऱ्यावर आला होता.

पाठलाग करणारेही किनाऱ्यावर आले. तेही त्याच्यामागे धावू लागले. तोंडाने ओरडू लागले.

‘चोर ! चोर ! धरा, पकडा !’

कैदी पुढे पळत होता. तोच त्या कैद्याला एक फ्रेंच शिपाई दिसला तो त्या शिपायाजवळ गेला व म्हणाला, ‘मला पोलिसचौकीवर घेऊन चल.’

तेवढ्यात पाठलाग करणारेही तेथे पोहोचले. फ्रेंच शिपाई त्यांना वश झाला. कैद्याला पाठलाग करणाऱ्यांच्या ताब्यात दिले. त्याला एक ठोसा मारला आणि म्हटले, ‘पळून जात होतास काय? तुला आता चांगले बडवतो आणि तळघरात डांबतो.’ त्यावर उसळून कैदी म्हणाला, ‘हां, खबरदार माराल बिराल तर! आम्ही तर तळहातावर शीर घेऊनच घरून निघालो आहोत! तुम्ही मात्र सांभाळा ! तशीच वेळ आली तर तुमच्यापैकी एकाचा तरी मी नक्कीच प्राण घईन!’ त्याची नजर आग ओकणारी होती.

कैदी बोटीवर आला. त्याला तळघरात पुन्हा कोंडले गेले. त्याचा प्रयत्न फसला. त्याला पुढे वर्षांनुवर्षे कष्टात काढावी लागली. पण तरीही त्या साहसामुळे त्याचे नाव जगभर गाजले. कोण होता हा कैदी? अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर.

सागरा प्राण तळमळला!

लंडन पोलीस विनायकरावांभोवती जाळे पसरू लागले. शेवटी सावरकरांनी लंडनमधील ते घर सोडले.

ते कधी बगीचा, कधी झाडाखाली, कधी रेल्वे स्टेशनवर राहू लागले. कधी जेवण मिळे तर कधी तसेच झोपावे लागे, तर कधी झोप सुद्धा मिळत नसे. त्यातच त्यांच्या वडीलबंधूंना, गणेशपंतांना जन्मठेपेची शिक्षा झाल्याची बातमी त्यांनी कळली.

विनायकरावांची प्रकृती ढासळली. त्यांना विश्रांतीसाठी लंडनबाहेर ब्रायटन खेड्यात नेले. ‘सागरास’ ही त्यांची प्रसिद्ध कविता ब्रायटन येथेच लिहिली गेली. एकदा ते आपल्या मित्रांबरोबर समुद्र किनाऱ्यावर बसले असता त्यांची प्रतिभा जागृत झाली. सुंदर ओळी लिहिल्या गेल्या

ने मजसी ने परत मातृभूमीला

सागरा प्राण तळमळला ।।

शेवटी सावरकर अतिशय आजारी पडले. त्यांना न्युमोनिया झाला. डॉ. मुथु नावाचे एक मद्रासी हिंदू बेल्समध्ये रुणालय चालवीत ते सावरकरांना आपल्या रुग्णालयात घेऊन गेले. औषध, खाणे, पिणे सगळा खर्च त्यांनी स्वतः सोसला.

थोडे बरे वाटल्यावर त्यांच्या मित्रांनी त्यांना फ्रान्सला विश्रांतीसाठी नेले. पण कामाची सवय त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी डॉक्टरांकडून दोन तास कामासाठी परवानगी घेतली. ‘शिखांचा इतिहास’ हा मराठी ग्रंथ ते त्या वेळात लिहू लागले. ग्रंथ सगळ्यांना समजावा म्हणून ते गुरूमुखी लिपी शिकले व ग्रंथसाहेबाचे वाचन करून ग्रंथ योग्यप्रकारे तयार केला. सावरकर जे काही लिहित ते इंग्रजसरकार जप्त करीत असत.

नाशिक कटात त्यांचे अनेक मित्र पकडले गेले. वडील भाऊ काळ्या पाण्यावर गेले. लहान भाऊ नारायण, त्यालाही सरकारने पकडले होते. त्यांचा छळ करित होते हे चित्र सावरकरांच्या डोळ्यांसमोरून जात नव्हते. त्यांचे मन भारतात ओढ घेऊ लागले. हे त्यांनी पॅरिसमधील मित्रांना बोलून दाखविले. त्यांचे मित्र चकित झाले.

काळ्या पाण्याची शिक्षा

रविवार दि. १३ मार्च १९१० रोजी रात्री सावरकर इंग्लंडमध्ये आले. व्हिक्टोरिया स्टेशनवर उतरताक्षणीच पोलीस अधिकारी त्यांच्यासमोर येऊन उभे राहिले. त्यांनी सावरकरांना ‘वॉरंट’ दाखविले. सावरकर पोलीस अधिकाऱ्याबरोबर चालू लागले. शेवटी त्यांना कोठडीत डांबण्यात आले.

या पोलीस चौकीवर असताना सावरकरांनी अनेक पत्रे गुपचूप बाहेर पाठविली. ने-आण करताना त्यांना सोडवून पळवून नेण्याचा प्रयत्नही त्यांच्या मित्रांनी केला, पण तो यशस्वी झाला नाही. लवकरच त्यांना ब्रिक्स्टनच्या तुरुंगात अधिक बंदोबस्ताने ठेवण्यात आले.

सावरकरांचे प्रकरण हिंदुस्थान न्यायालयापुढे चालवायचे की इंग्लंड न्यायालयापुढे चालवयाचे हा न्यायाधीशांपुढे पहिला प्रश्न होता. त्यावर बराच वाद झाला.

सावरकरांनी हिंदुस्थानात गुन्हे केले आहेत. तेव्हा त्यांचा खटला हिंदुस्थान न्यायालयापुढे चालावा असा न्यायाधीशाने निर्णय दिला. त्यांच्या संबंधीचे सगळे कागदपत्र हिंदुस्थानात पाठविण्यात आले आणि दिनांक १ जुलै १९१० रोजी सावरकरांनाही ‘मोरिया’ नावाच्या बोटीवर चढविण्यात आले.

मोरिया बोट चालू झाली. सावरकरांच्या डोक्यातही विचारचक्रे फिरू लागली. त्यांनी निश्चय केला की इथून सुटायचे.

२२ जुलै १९१० रोजी त्यांना मुंबईत आणण्यात आले. इकडे नाशिक कटाचा खटला चालूच होता. २४ डिसेंबर १९१० सावरकरांना जन्मठेपेची काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली.

जन्मठेप म्हणजे काळे पाणी।

दोन जन्मठेपेच्या शिक्षा । पन्नास वर्षांचे काळे पाणी? हसतमुखाने त्यांनी ती शिक्षा स्विकारली.

सावरकरांना आता भायखळ्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तेथे त्यांनी सप्तर्षि ही कविता लिहिली. गुरु गोविंद‌सिंहावरील काव्यही त्यांनी येथेच लिहिले. पुढे त्यांना ठाणे तुरुंगात ठेवण्यात आले. अंदमानला न्यायचे म्हणून गाडीत बसविण्यात आले. अखेरीस गाडी मद्रासला पोहोचली. तिथून पुढे अंदमानमध्ये नेण्यात आले. ४ जुलै १९११ रोजी. तिथे अनेक प्रकारच्या शिक्षा असत. झाडे तोडणे, लाकडे कापणे, नारळाचे तेल काढणे, काथ्या कुटणे, चहाच्या मळ्यांत अथवा भाजीच्या बागेत गवत काढणे, पाने-फळे तोडणे, अशी कामे कैद्यांकडून करविली जात असत. येथील तुरुंग खूप मोठा व बळकट बांधणीचा होता. तुरुंगाच्या मुख्य अधिकारी बारी आयरीश होता. याची शिस्त फार कडक होती.

सावरकरांना सात क्रमांकाच्या चाळीच्या मजल्यावरील कोठडीत बंद करून ठेवण्याची बारीने आज्ञा दिली. मनाच्या पाटीवर, अनुष्टुभ वृत्तातील ‘कमला’ काव्य तयार होऊ लागले, श्लोक रचायचे आणि पाठ करायचे असा त्यांनी क्रम ठेवला.

६ जानेवारी १९२४ रोजी सरकारने विनायकरावांनाही कैदेतून सोडले. पण रत्नागिरीत ६ जानेवारी १९२४ ते ९ मे १९३