नाशिक जिल्ह्यात चिमुकल्या दारणा नदीच्या किनाऱ्यावर भगूरजवळ राहूरी गाव आहे. जे सावकर घराण्याला बक्षिस म्हणून मिळाले. याच गावचे सावरकर होत. महादेव आणि दामोदर दोघे भाऊ होते. महादेव मोठे होते. त्यांना बापूकाका म्हणत. महादेव आणि दामोदर यांचे आपसात पटत नसे. ते निरनिराळे रहात होते.
दामोदरपंत सावरकरांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. गावात इंग्रजी शिक्षण घेतलेले ते एकटेच होते. त्यांना वाचनाची खूप आवड होती. गावातील मोठ्या मंडळींना ते मान देत. दामोदरपंत गावातल्या लोकांना वर्तमानपत्रे वाचून दाखवीत.
दामोदरपंतांचे लग्न लहानपणीच झालेले होते. त्यांच्या पत्नीचे नाव राधाबाई होते. ती सुशील व मायाळू होती. अडचणीला ती साऱ्यांना मदत करीत असे. त्यांना दोन मुले झाली होती ती लवकरच वारली. राधाबाई अष्टभुजा देवीची भक्ती करे. तिच्याच कृपाप्रसादामुळे त्यांना पुढे दोन मुले झाली. गणेश उर्फ बाबा, विनायक उर्फ तात्या म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर.
तात्याचा जन्म सोमवार दिनांक २८ मे १८८३ रोजी झाला. त्यांना धाकटी बहीण होती माई. सर्वांत लहान भाऊ नारायण उर्फ बाळ.
इसवी सन १८९२ साली राधाबाई वारल्या. त्यावेळी विनायक अवघा नऊ वर्षांचा होता. बहीण माई पाच वर्षांची होती आणि नारायण दोन वर्षांचा होता. सारी मुले आईविना पोरकी झाली.
सावरकरांच्या वडिलांना, दामोदरपंतांना पत्नी गेल्याचे फार दुःख झाले. ते पत्नीच्या विरहाने म्हणत, ‘साक्षात लक्ष्मी होती माझी राधा. ती गेली आणि तिच्याबरोबर या घरातील सगळे सुख गेले. आता घरात राहणेही नको!’
खरोखरच त्यांनी राधाच्या आठवणी नकोत म्हणून आपले जुने घर सोडले व नव्या घरांत ते मुलांना घेऊन राहू लागले. आईच्या प्रेमळपणाने ते मुलांचा सांभाळ करू लागले. त्यांचा अभ्यास, दुखणं, खूपणं सारे पाहू लागले. विनायकाला पहिल्यापासून काव्याची आवड होती. त्याला काव्याची गोडी लागली होती ती वडिलांमुळे.
लहानपण
विनायकाला खूप मित्र होते. सगळ्यांमध्ये तो प्रिय होता. लहान असतानाच तो कविता करीत असे. सुंदर अक्षर असलेला विनायकचा गोपाळ देसाई नावाचा मित्र होता. तो एका वहीत विनायकाच्या कविता मोठ्या प्रेमाने लिहून ठेवी. परशुराम शिंपी, राजाराम शिंपी हे पण विनायकचे जिवलग दोस्त होते. त्यांना विनायकच्या कविता पाठ करायला आवडायच्या.
सारी दोस्त मंडळी घरात बसून वाचन-लेखन तर करायचीच शिवाय तालमीलाही जायची. नदीवर पोहायची. लढाई लढाई खेळायची. विनायक लहानपणापासूनच देशक्रांतीवीरांच्या गोष्टी मन लावून ऐकत असे व नंतर त्याच गोष्टी आपल्या मित्रांना सांगत असे..
दामोदरपंत विनायकाला मोठ्या प्रेमाने नवीन नवीन पुस्तके आणून देत. पुस्तक मिळाले रे मिळाले की विनायक आनंदून जायचा. पुस्तकातले चांगले चांगले उतारे पाठ करायचा. आश्चर्य म्हणजे त्या लहान वयातच छोट्या विनायकाने मोरोपंतांच्या शेकडो आर्या पाठ केल्या होत्या, ज्या तो बिनचूक म्हणून दाखवीत असे. रामायण, महाभारतातील सगळ्या गोष्टी तो मन लावून वाचे. त्या काळातील प्रसिद्ध अशी चिपळूणकरांची संपूर्ण निबंधमाला त्याने वाचली होती.
कथा, कविता, इतिहास, निबंध या साऱ्यांचीच विनायकला आवड होती. पुस्तके हे त्याचे जिवलग मित्र होते. विनायकची बुद्धी तल्लख होती. वाचन दांडगे होते. एकदा त्याच्या हातात आरण्यके आली. तीसुद्धा त्याने वाचून काढली. हाती आलेले पुस्तक वाचल्याशिवाय तो सोडत नसे.
त्या ग्रंथातील उत्तम विचार आणि गोड शब्दरचनेने विनायकाला अगदी मोहवून टाकले. तो इतका वाचनात गढून जात असे की तीनतीनदा हाका मारल्या, तरी त्याला ऐकू येत नसे. बळेच त्याला जेवायला, खायला घालायला लागायचे. असे चार दिवस त्याने अरण्यक वाचले. दामोदरपंतही चकीत झाले.
आरण्यकेबाबत अशी समजूत होती की ही आरण्यके वनात जाऊनच वाचावीत. पण छोट्या विनायकाने लहानपणीच ती आपल्या घरात बसून वाचली. ते पाहून दातोदरपंतांच्या मनात विचार आला, ‘अरेरे! माझ्या घराचे अरण्य तर नाही होणार !… विनायकाचे पुढे कसे होणार?’ या काळजीने त्यांच्या डोळ्यात पाणी आले. लहानपणापासून विनायक हुड होता.
एक दिवस वडील विनायकला घेऊन नाशिकला गेले. त्याला बाबांच्या मोठ्या भावाच्या स्वाधीन केले. त्यावेळेपासूनच घरातल्या सर्वांना विनायक फार मोठा होणार अशी जाणीव झाली. विनायकचा थोरला भाऊ बाबा त्याची सगळ्या गोष्टींची अतिशय काळजी घेत. ते त्याला अगदी फुलासारखे जपे. त्याच्या खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था ठेवी. विनायक तालमीत जाऊ लागल्यापासून बाबांनी त्याच्यासाठी पौष्टिक आहाराची व्यवस्था केली. पुढे विनायकला अनेक मित्र मिळाले. शाळा, तालीम आणि उरलेला सगळा वेळ वाचन असा त्याचा दिनक्रम असे. बाबाचे मित्र जेव्हा जेव्हा यायचे तेव्हा विनायक पुस्तकात डोके खूपसून बसलेला आढळे. त्यामुळे त्याला सारेजण पुस्तकातील कीडा म्हणू लागले. एक दिवस बाबाच्या मनात आले ‘हा मुलगा नुसतेच वाचन करीत नाही तर त्यातील तत्वे लक्षात ठेवतो, समजावून घेतो व तीच श्रेष्ठ तत्वे जीवनात आणण्याचा प्रयत्न करतो. या मुलाच्या अंगी वेगळे असे एक प्रकारचे तेज आहे.’ याची बाबाला खात्री पटली.
पहिले बक्षिस भाषणाचे
त्यावेळी नाशिकला एक भाषणस्पर्धा होती. विनायकाने त्यात भाग घेतला व आपल्या बुद्धीमत्तेची चुणूक भाषणातून दाखवली आणि पहिल्या क्रमांकाचे बक्षिस मिळविले. त्याचे भाषण ऐकून सर्व मंडळी चकीत झाली. ती एकमेकांना म्हणू लागली, ‘काय वेगा केवता आवेश। किती तर्कशुद्ध रचना आणि प्रत्येक वाक्याचे उच्चार अगदी धारदार ! खरंच! एकेक शब्द अगदी मनाकेवढा पगारा इतक्या लहान वयात एवढी बोलण्याची सुंदर हातोटी पाहून सारेजण चकित झाले.
प्लेगची साथीतून मुक्त
इसवी सन १८९९ साली नाशिकला प्लेगची साथ आली. शाळा ओस पडल्या. दामोदरपंतांनी मुलांना आपल्या घरी आणले. पण दुर्दैवाने भगूरलाही प्लेग साथ सुरू झाली.
दामोदरपंत मुलांना गावात कोठे जाऊ देत नसत. पण स्वतः मात्र कोणी आजारी पडल्याचे कळताच मदतीला धावत, एके दिवशी ते इतक्या उशिरा घरी परतले, अन् दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरी आले. अंथरूणावर पडले, फणफणले होते. त्यांना प्लेगची गाठ आली होती.
५ सप्टेंबर १८९९ ला मध्यरात्री विनायकाला पोरके करून काळाने दामोदरपंतांना ह्या लोकातून नेले. मुले, आई- वडिलांविना अनाथ झाली. पण त्याचवेळी या संकटात दामोदरपंताचे भाऊ मुलांच्या मदतीला धावले. बापूकाकांनी त्या पोरक्या पोरांना आधार दिला. ते भांडण विसरले पण ते दैवाला तेही पाहवले नाही.
थोड्याच दिवसात त्यांनाही प्लेगने घेरले व त्यात त्यांचा मृत्यु झाला. विनायकचा धाकटा भाऊ नारायणही प्लेगच्या भक्ष्यस्थानी पडला. त्याला प्लेगच्या रुग्णालयात ठेवण्यात आले. त्याच्या सेवेसाठी विनायकचा थोरला बंधू बाबा तेथेच राहात.
प्लेगमुळे सारेच रडकुंडीला आले. भीतीची तलवार त्यांच्या डोक्यावर टांगलेली असे. शेवटी बाबांनाही प्लेग झाला; त्यांनाही रुग्णालयात राहावे लागले. तथापि ईश्वर-कृपेने तात्या आणि नारायण दोघेही रोगमुक्त झाले आणि सुखरूप घरी आले.
प्लेग ओसरला. परत विनायकाची नाशिकची शाळा सुरू झाली. पण शाळेव्यतिरिक्त त्याचे शाळेबाहेरचे अनेक उद्योग सुरू झाले. हळूहळू विनायक आता निवडक मित्र जोडू लागला. विनायकाचे विशेष सख्य जमले पागे आणि म्हसकर यांच्याशी. दोघेही जहाल विचारसरणीचे होते.
नाशिकला घर
सावरकर कुटुंब नाशिकला तिलभांडेश्वराच्या गल्लीत राहत होते. त्याच गल्लीत काही दिवसांनी आबा दरेकर राहायला आले. त्यांच्या पत्नीचे नाव होते आनंदीबाई. आनंदीबाईने मोलमजुरी करून मुलांचा सांभाळ केला. विनायकभोवती सदा मित्रमंडळींचे कडे असे. तिलभांडेश्वर गल्लीत राहायला आल्यावर त्याने विनायकाची कीर्ति ऐकली. चाफेकरांवर त्याने रचलेला फटका ऐकला. दरेकर विनायकाला भेटायला आला. अन् पहिल्या भेटीतच विनायकचा शिष्य बनला.
फुलांच्या सहवासाने माती गंधित होते अगदी तसेच विनायकच्या मैत्रित होते. आबाचे हृदय जाज्वल्य देशप्रेमाने भरून आले. तो वीररसाने भरलेले पोवाडे गाऊ लागला. मुले गोळा करून त्यांच्यावर देशभक्तीचे संस्कार घडवू लागला.
‘मित्रमेळा’ संस्था स्थापन
पागे, म्हसकर, दरेकर आदी मंडळींच्या साहाय्याने विनायकाने १ जानेवारी १९०० रोजी ‘मित्र मेळा’ ही संस्था सुरू केली. गणेश उत्सव आणि शिवजयंती हे दोन उत्सव मित्रमेळा संस्था थाटाने साजरे करी. वर्षभर लहान-मोठी व्याख्याने, वक्तृत्त्व स्पर्धा, वादविवाद इत्यादी कार्यक्रम असत. सगळ्या शहरात मित्रमेळ्याच्या उत्सवाची प्रशंसा होई.
मित्रमेळ्याच्या बैठकी आबा दरेकराच्या घरी होत. मग कार्यक्रमाची रूपरेषा आखली जायची, अनेक ओळखी झाल्या. स्वातंत्र्य चळवळीसाठी विचार होई, खास भक्तांनाच या गाभाऱ्यात म्हणजे मेळाव्यात घेतले जात असे. हा गाभारा म्हणजे ‘राष्ट्रभक्त समूह’ नावाची गुप्त मंडळी ‘मित्रमेळा’ जनजागृतीचे काम करीत असत. ‘राष्ट्रभक्त समूह इंग्रजांशी लढा देण्याच्या गुप्त योजना
भगूरच्या घरी चोरी
वडील गेले, काका गेले. भगूरच्या घराला कुलूप लागले. तिथले व्यवहार थांबले. थोरला बंधू बाबा मधून मधून गावी जाई. थोडे पैसे, धान्य घेऊन येई. थोडे दिवस ठीक चालले.
एक दिवस बातमी आली की, भगूरच्या घरात चोरी झाली. बाबाने आणि तात्याने जाऊन पाहिले तर आख्खे घर अगदी रिकामे झाले होते. सारे चोरट्याने लांबवले होते. पेटचा फोडल्या, कागदपत्रे नाहिशी झाली, लहान-मोठी भांडी देखील गायब झाली.
दामोदरपंत गावात काही देणे-घेणे लागत होते. सावकार मात्र नाशिकला वारंवार खेपा घालू लागले. येसूवहिनीचे दागिने बाजारात विकून तात्या आणि बाबाने सावकाराचे कर्ज फेडले. पण त्यामुळे रोजच्या खर्चाची तोंड मिळवणी करता येईना. आता बाबानी छोट्या-मोठ्या नोकऱ्या करायला सुरूवात केली.
बाबांचे पाय अश्रूनी धुतले
संक्रांतीचा सण आला. येसूवहिनी हळदीकुंकवाला जायला निघाल्या, पण अंगावर दागिने नव्हते. विनायकने ते पाहिले. त्यावेळी वहिनीने सारा प्रकार सांगितला. तिचे सर्व मोठे दागिने कर्जापायी गेले होते. काही दागिने बाबांनी भोळेपणाने घालविले होते. घर चालवण्यासाठी काही विकावे लागले होते. अगदी दुष्काळी कामावरसुद्धा बाबा गेले होते.
हे सगळे ऐकून विनायकला राग आला. तो थोरल्या बंधूला म्हणाला, ‘बाबा, मी आजपासून शाळा सोडली. यापुढे मीही तुमच्यासारखीच नोकरी करीन किंवा पडेल ते लहान-मोठे काम करीन. तुम्ही जिवापाड मेहनत करता आणि मी आरामात राहून, शाळेत जाऊ हे मला आता जमणार नाही.’
विनायकाचे ते बोलणे ऐकून बाबाच्या डोळ्यात पाणी आले. ते म्हणाले, ‘नाही रे तात्या, असे बोलू नकोस. शेवटी तुझी जबाबदारी माझ्यावरच आहे. आपल्या अण्णांना तुला फार मोठे करायचे होते ती जबाबदारी माझी आहे. ती त्यांची इच्छा कसेही करून मला पूर्ण केली पाहिजे. तात्या, तुझ्यात काहीतरी दैवी शक्ती आहे, तू पूर्वजन्मीचा थोर तपस्वी आहेस. आमच्या घरात जन्माला आला हे आमचे मोठे भाग्य आहे. तू पुढे महान पुरुष होणार आहेस. तुला सांभाळावे हेच आमचे कर्तव्य आहे. आम्ही वाटेल ती खटपट करू पण तुला कधीही कसल्याही गोष्टींचा कमतरता होऊ देणार नाही. तू खूप अभ्यास कर. वाचन, लेखन करून खूप कीर्ती मिळव व आपल्या घराण्याचा उध्दार कर.’
बाबाचे हे बोलणे ऐकून विनायकाला काय बोलावे ते सुचेना. आपल्या मोठ्या भावाचे मन किती विशाल सागरासारखे आहे, या विचाराने त्यांच्या डोळ्यात अश्रूची गर्दी झाली. त्यांनी बाबाच्या पायावर डोके ठेवले, त्याच आसवांनी बाबाचे पाय अक्षरशः धुवून काढले.
बाबांच्या प्रेमाचे दर्शन
त्यावेळी विनायक दहावीला असेल. अचानक तो खूप आजारी पडला. विनायकाला फणफणून ताप चढला. दोन दिवस झाले, चार दिवस झाले तरी पण ताप हटेना. बाबाच्या तोंडचे पाणी पळाले. प्रसिद्ध वैद्याचं औषध सुरू केले. पण उतार पडेना.
एक दिवस तर विनायकाने अगदी डोळे पांढरे केले. सर्वांनी आता आशाच सोडली. तापातही विनायक बरळत होता. ‘बाबा माझ्या पुढील शिक्षणाचे कसे होणार?’ हे ऐकून बाबानी विनायकाच्या मस्तकावरून प्रेमाने हात फिरविला आणि ते म्हणाले, ‘तात्या, त्याची काही एक काळजी करू नकोस. मी वाटेल तेवढे कष्ट करीन; वेळ आली तर भीक सुद्धा मागेन पण तुझ्या सर्वोच्च शिक्षणाची मी व्यवस्था करीन. तू लवकर बरा हो!’ बाबांच्या प्रेमाचे दर्शन विनायकाला परत एकदा झाले. बाबाच्या इच्छेप्रमाणे विनायकला आराम पडला. तो पुन्हा शाळेत जाऊ लागला.
मी धन्य झालो..’
पुढे भारत १९४७ साली स्वतंत्र झाला. विनायक दामोदर सावरकर ८३ वर्षे ते जगले होते. जीवनात त्यांना आता काहीही रस उरला नव्हता. महापुरुषांचा मार्ग त्यांनी स्वीकारला. शेवटच्या वीस दिवसांत पाण्याशिवाय त्यांनी काहीच घेतले नाही. दि. २६ फेब्रुवारी १९६६ रोजी दुपारी ११ वाजून ३० मिनीटांनी त्यांनी इहलोकीची यात्रा संपविली.
‘मी धन्य झालो, करायचे असे एकही कार्य उरले नाही. सर्व कर्तव्यांतून मी मुक्त झालो. या आनंदात त्यांनी प्राण सोडला. थोर स्वातंत्रवीर विनायकराव सावरकरांना आपला कोटी कोटी प्रणाम. त्यांचा आदर्श ठेवून वागण्याची आज नागरिकांना गरज आहे