बालपण
रवींद्रनाथांचा जन्म कलकत्ता येथे एका संपन्न जमीनदाराच्या घराण्यात झाला. त्यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर हे महर्षी म्हणून प्रसिध्द होते. समाजातील थोर नेते म्हणून त्यांचा लौकिक होता.
रवींद्रनाथांचे पूर्वज बंगालमधील खुलना जिल्ह्यातील. काही कारणामुळे आपलं खेड्यातील घर सोडून ते गोविंदपुर • येथे आले. गोविंदपूरमध्ये त्यांनी लवकरच चांगला जम बसवला. गावातील सारे लोक त्यांना आदराने ठाकूर म्हणू लागले.
पुढे काही युरोपियन लोकांनी ‘ठाकूर’ चा उच्चार ‘टागोर’ असा केला. तेव्हापासून गावातले लोकही त्यांना टागोरच म्हणू लागले.
ह्या टागोर घराण्यात रवींद्रनाथांचा जन्म ७ मे १८६१ रोजी झाला. रवींद्रनाथांच्या वडिलांचे नाव देवेंद्रनाथ व आईचे नाव शारदादेवी, रवींद्रनाथांना खूप भावंडे होती. रवींद्रनाथांचे बालपण श्रीमंतीत गेले. टागोर घराणं सुखवस्तू होते. कुठल्याच वस्तूची रवींद्रनाथांना कमतरता भासली नाही. एवढे ऐश्वर्य असूनही रवींद्रनाथांना मात्र साधेपणानं राहायलाच आवडे.
जेवणात पौष्टिक पदार्थ, नेसायला उंची कपडे, मोजे बूट, असा रवींद्रनाथांचा थाट होता. रवींद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ यांचा धर्मतत्त्वज्ञान या संबंधीचा अभ्यास दांडगा होता. देवेंद्रनाथांना शहरापेक्षा खेड्यात राहायला फार आवडायचं. ते आपला बराचसा वेळ निसर्गसान्निध्यात घालवीत असत. ते वरचेवर हिमालयात जात. रामकृष्ण परमहंसांचे ते भक्त होते. त्यांच्या घरात धार्मिक व तत्त्वज्ञानाच्या प्रश्नावर सतत चर्चा होत असे.
त्यांच्या घरात अधून मधून नाटके केली जात, कवितांचे वाचन होई. गाण्याचे कार्यक्रम होत. नामवंत कवी, संगीतज्ज्ञ आणि पंडित यांची त्यांच्या घरी वरचेवर ये जा असे. अशा वातावरणात रवींद्रनाथांचे बालपण गेले.
लहानपणापासूनच घरात सांस्कृतिक, साहित्यिक संस्कार रवींद्रनाथांच्या बालमनावर झाले म्हणूनच की काय ते मोठेपणी सर्वश्रेष्ठ कवी, नाटककार, कादंबरीकार म्हणून प्रसिद्धीस आले ?
रवींद्रनाथ हे सर्व भावंडात लहान असल्यामुळे सर्वांचे ते लाडके होते. त्यांना सर्वजण ‘रवी’ म्हणत. रवींद्रनाथांचे कुटुंब मोठं असल्याने त्यांच्या आईला त्यांच्याकडे पाहायला वेळच मिळत नसे. छोट्या रवीची सारी देखभाल नोकरांनीच केली. रवीचे वडील सतत फिरतीवर असल्यामुळे त्याला वडिलांचाही सहवास कमी लाभला. पण जेव्हा केव्हा वडील घरी असत तेव्हा रवी त्यांना एक क्षणही सोडीत नसे.
वडिलांच्या तोंडून हिमालयाचे वर्णन ऐकायला त्याला फार आवडे. प्रचंड हिमालय, त्याची बर्फाच्छादीत उंच उंच शिखरे, कडेकपाऱ्यावरून उड्या घेणाऱ्या त्या बर्फाच्या नद्या. सारं त्याच्या डोळ्यापुढे जसेच्या तसे उभे राही. असं काहीसं वर्णन ऐकून त्याचे हिमालयाबाबतचे आकर्षण वाढले होते. त्याला वाटे आपणही हिमालयात जावे, बाबांसारखे खूप खूप भटकावं आणि तेथील सारे सृष्टिसौंदर्य डोळ्यात प्रत्यक्ष साठवून घ्यावं.
रवीला लहानपणापसूनच निसर्गाची आवड होती. कित्येकवेळा तो घराच्या खिडकीतून बाहेरचा निसर्ग बघण्यात दंग होऊन जाई. बागेतील प्रसन्न फुले, आकाशात उडणारे विविध रंगी पक्षी, त्यांची किलबिल यात छोटा रवींद्र खूप रमे. या निसर्गप्रेमामुळेच रवींद्रचं मन कविमन झालं.
शालेय शिक्षण
रवीचं शिक्षण कलकत्त्याच्या शाळेत झालं. त्याला अभ्यासाची फारशी आवड नव्हती. शाळेत त्याला कोंडल्यासारखं होई. चार भिंतीत शिकवलं जाणारं शिक्षण त्याला निर्जीव वाटायचं. म्हणून त्याने शाळा सोडून दिली व घरीच अभ्यास करायला सुरवात केली. त्याचे वडील बंधू व बहिणी त्याला शिकवीत. घरच्या अभ्यासाचे वेळापत्रकही काटेकोरपणे पाळले जाई.
सूर्योदयापूर्वी उठून व्यायाम व स्नान झाल्यानंतर अभ्यासाला सुरुवात होई. शरीरशास्त्र, गणित, बंगाली, संस्कृत, इंग्लिश, चित्रकला, इ. विषय शिकवायला निरनिराळे शिक्षक घरी येत असत. संध्याकाळी शारीरिक शिक्षणाचा तास होई. चित्रकला शिकवली जाई, व्याकरण, वाक्यरचना व निबंध कसे लिहायचे हेही शिकवले जाई. त्यानंतर संगीताचा तास होई. संगीताच्या तासात रवी खूप रमे.
बनू नये आपल्या मुलाला सर्व प्रकारचं ज्ञान मिळावं, तो नुसताच पुस्तकातला किडा असं त्याच्या वडिलांना नेहमी वाटे म्हणूनच रवीला सर्व प्रकारचं शिक्षण देण्यासाठी निरनिराळे शिक्षक घरी येत होते. रवीही सारं काही आत्मसात करीत होता.
बालपणीच कवीमन
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसेच झाले रवीचे. त्याने वयाच्या नवव्या वर्षी पहिली कविता केली. यमक साधून छंदोबद्ध कविता आपल्याला करता आली याचा त्याला त्यावेळी खूप आनंद झाला. त्यावेळेपासून त्याला कविता करण्याचा जणू छंदच लागला. रवी निसर्गप्रेमी असल्यामुळे त्याने सृष्टिसौंदर्यावर छान छान कविता केल्या.
हिमालयाची सफर बालवयातच…
एकदा रवी चित्र काढीत बसला होता इतक्यात त्याला त्याच्या वडिलांनी हाक मारली पण रवी चित्र काढण्यात इतका दंग होता की त्याला वडिलांच्या हाकेला ‘ओ’ द्यायचेही भान राहिले नाही.
आपल्या हाकेला ओ दिली नाही म्हणून त्याचे वडील रवी इतका कशात दंग आहे हे बघायला आले व त्याच्या मागे गुपचूप येऊन उभे राहिले.
आपला मुलगा चित्र रेखाटण्यात दंग आहे हे पाहून त्यांना समाधान वाटले. त्याने काढलेले निसर्गचित्र पाहून रवीचे वडिल बेहद्द खूष झाले. आपल्या मुलाला आपल्या सारखेच निसर्गप्रेम आहे हे पाहून त्यांना अभिमान वाटला.
आपले वडील आपल्या मागे येऊन उभे राहिले आहेत याचंही भान रवीला नव्हतं. जेव्हा त्याचे वडील म्हणाले, ‘व्वा! काय सुंदर चित्र काढले आहेस ! मोठेपणी तू नक्की चित्रकार होणार..!’ तेव्हा रवी भानावर आला नि त्याने एकदम वडिलांच्या गळ्याला मिठीच मारली. वडील त्याला म्हणाले, ‘रवी किती छान निसर्गचित्र काढले आहेस तू? तुला खरोखरच निसर्ग एवढा आवडतो ?
‘हो बाबा, खूप खूप आवडतो.’
‘रवी, तुला हिमालय पाहावासा वाटतो ना?’
‘हो. मी एकदा तरी हिमालयात जाऊन राहाणार आहे.’
‘अरे रवी एकदा तरी कशाला? चल आत्ताच चल माझ्याबरोबर.’
‘खरंच बाबा? मला तुम्ही खरोखर आत्ताच हिमालय दाखवणार?’
‘अरे खरंच. लाग तयारीला. आईला सांग तुझे कपडे आणि खाऊ द्यायला.’
वयाच्या बाराव्या वर्षी आपल्याला हिमालय पाहायला मिळणार याचा खूप आनंद झाला होता रवीला. ‘मी हिमालयात जाणार…’ असे तो भेटेल त्याला सांगू लागला. त्याने लगेचच तयारीला सुरवात केली. आपला अभ्यास बुडेल वगैरे असा काही विचार सुध्दा केला नाही त्या निसर्गवेड्या रवीने. निसर्गात जायला मिळणार म्हणून त्याला खूप खूप आनंद झाला होता.
हिमालयाच्या वाटेवर
हिमालयात जाताना ते दोघे बापलेक काही दिवस बोलापूर येथे थांबले. येथून पाच मैलावर त्यांची लहानशी मालकीची जमीन होती. त्याला त्यांनी ‘शांतिनिकेतन’ हे नाव दिलं होतं. हेच शांतिनिकेतन पुढे काही वर्षांनी रवींद्रनाथांच्या जीवनाचं, ध्येयाचं सर्वस्व झालं. आयुष्यातील बराच काळ त्यांनी इथे घालवला.
शांतीनिकेतनहून पिता-पुत्र ‘डलहौसी’ या आरोग्यग्रामात आले. एका पर्वत शिखरावर त्यांनी एक तंबू भाड्याने घेतला. या तंबूभोवती हिरवागार निसर्ग होता. देवदार वृक्षांचे बन होते. तो परिसर अत्यंत रम्य होता. तिथून हिमालयाचे दर्शन होई. रवींद्र हा हिमालय डोळे भरून पहात असे. वडिलांबरोबर तो हिमालयात खूप फिरला. हिमालयात फिरताना त्याचे कवीमन जागे झाले. त्याने अनेक काव्ये केली.
रवींद्र इंग्लंडला खाना
लहान वयातच रवींद्र हिमालय फिरून आल्यामुळे त्याचे घरात साऱ्यांनाच कौतुक वाटू लागले. इतक्या वर्षात त्यांच्या घरातून वडिलांशिवाय कोणीच हिमालयात गेले नव्हते. त्याच्या कविता सारेजण प्रेमाने व कौतुकाने ऐकू लागले.
रवींद्रने संस्कृत भाषेतही चांगले प्राविण्य मिळवले होते. रामायणातील संस्कृत उतारेच्या उतारे त्याचे तोंडपाठ होते. लोकंही त्याला कौतुकाने ते उतारे म्हणायला सांगत.
रवींद्र आता तेरा-चौदा वयाचा झाला होता. त्याने इंग्रजीतही चांगले प्राविण्य मिळवले होते. शिक्षकांच्या प्रोत्साहनामुळे शेक्सपियरच्या ‘मॅक्बेथ’ या नाटकाचे त्याने बंगालीत भाषांतर केले.
रवीला वाचनाचेही खूप वेड होते. त्याने इतिहास, लोककथा, आख्यायिका व पुराणे यांचेही वाचन केले. रवींद्रचे शालेय शिक्षण यथातथाच झाले. पध्दतशीर असे त्यांचे शिक्षण झाले नाही. बंगाली व संस्कृत भाषांचा अभ्यास त्यांनी घरीच केला. अफाट बुध्दिमत्ता असल्यामुळेच हे त्यांना शक्य झाले. घरीच त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केलेही.
त्याची साहित्यातील गती, त्याची कलांची आवड पाहून त्याच्या वडिलांना त्याच्याविषयी अभिमान वाटत होता; परंतु त्याची शाळेची नावड बघून त्यांना वाईटही वाटे. रवीनं शाळेत जाऊन परीक्षा द्याव्यात, पहिला नंबर मिळवावा असे त्यांना वाटे पण रवीचं मन चार भिंतीच्या आतील वर्गात कधी रमलेच नाही.
शेवटी रवीच्या वडिलांनी रवीला पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवायचे ठरवले. रवीचे मोठे भाऊ सत्येंद्रनाथ त्यावेळी इंग्लंडला होते. रवी त्यांच्याबरोबर इंग्लंडला गेला.
पाश्चात्त्य संस्कृतीचा अभ्यास
सत्येंद्रनाथांनी स्वतःचा असा ग्रंथसंग्रह केला होता. रवीने त्या ग्रंथांचे वाचन केले. युरोपियन कींच्या साहित्यकृतींची त्याने भाषांतरे केली. एका मिशनरी महिलेकडे ते जर्मन शिकले. इंग्लंडमध्ये ब्रायटन येथे रहाण्यासाठी त्यांना सुंदर घर होतं. सर्व सुखसोयी त्यांना तिथे होत्या; परंतु रवीचं मन तिथे रमत नव्हत. तेथील नैसर्गिक वातावरण त्याला रम्य न वाटता आर्द्र, धूसर व खिन्न वाटे. त्यांच्या मनात शहरी जीवनाविषयी गोडी कधी निर्माण झालीच नाही.
शैक्षणिकदृष्ट्या रवीला इंग्लंडच्या भेटीमुळे फारसा लाभ मिळाला नाही; परंतु पाश्चात्य संस्कृतीची चांगली ओळख त्याला झाली. इंग्रजी काव्याचा त्यांनी तिथे अभ्यास केला व पाश्चात्य संगीतही जाणून घेतलं.
रवींद्रनाथ टागोर म्हणून प्रसिध्दीस
रवी आता वयानं, बुद्धीनं, विचारानं व कर्तृत्वानं मोठा झाला होता. प्रचंड बुध्दिमत्तेबरोबरच त्यांची वैचारिक शक्तीही दांडगी होती. त्यांनी वेदांचा तसेच पाश्चात्य संस्कृतीचाही अभ्यास केला होता. उपनिषदांचा उदात्त आदर्शवाद, पाश्चात्य विचारांचा बुद्धिवाद, वैष्णवांचे प्रेम, येशूचा मानवतावाद या साऱ्यांचा त्यांनी योग्यरीतीनं विचार केला. बुद्धीला पटेल तेच त्यातले घेतले.
त्यांचा स्वदेशाभिमान जाज्वल्य होता याचे कारण त्यांच्या घरात तसेच वातावरण होते आणि मोठमोठ्या विचारवंतांचांही त्यांना सहवास लाभला होता. त्यामुळेच तो जास्त काळ इंग्लंडमध्ये रमला नाही. तो आपल्या मायदेशी परत आला.
त्याने इंग्लंडहून आल्यानंतर चार हजार ओळींचे एक काव्यात्मक नाटक लिहिलं. त्याचं नाव ‘वाल्मिकी प्रतिभा’. हे संगीतप्रधान नाटक लिहून त्यांनी प्रसिद्ध केलं. ते खूप लोकप्रिय झालं. त्यांची पहिली कादंबरी ‘भारती’ मासिकात क्रमशः प्रसिध्द झाली. साधना, भारती व वंगदर्शन या मासिकांचे त्यांनी संपादन केले होते. रवींद्रची लोकप्रियता वाढली मग अशा महान प्रतिभावंताला आदरार्थी संबोधलं जाऊ लागलं ‘कविवर्य रवींद्रनाथ.’ इंग्लंडहून परतल्यावर रवीला सर्वजण आता ‘रवींद्रनाथ टागोर’ म्हणू लागले होते.
काव्यप्रतिभेला बहर
रवींद्रनाथांच्या काव्यप्रतिभेला अधिकाअधिक बहर येऊ लागला. एका पहाटेच्या वेळी घराच्या गच्चीत उभे असताना त्यांना दाट झाडीतून उगवत्या सूर्याचे दर्शन झाले. त्यामुळे त्यांना एकदम काव्य सुचले. त्यांनी ‘निर्झर स्वप्नभंग’ या कवितेत आपला तो अनुभव, ते गूढदर्शन काव्यात लिहिलं. रवींद्रनाथांनी अनेक कविता लिहिल्या त्या ‘प्रभात संगीता’ या नावाने प्रसिद्ध आहेत.
रवींद्रनाथांचे भाऊ सत्येंद्रनाथ कारवारला होते, त्यावेळी रवींद्रनाथही तिथे गेले होते. तिथला तो रम्य सागरकिनारा, निसर्गसौंदर्य पाहून त्याचं कविमन वेडावून गेलं, हरखून गेलं. त्यांनी अनेक कविता त्या ठिकाणी लिहिल्या. या ‘छबि ओ गान’ या नावाने प्रसिद्ध आहेत.
नोबेल पारितोषिकाचा मान
रवींद्रनाथांचा विवाह मृणालिनी देवी नावाच्या मुलीशी झाला. त्यांची पत्नी कर्तबगार व सौजन्यशील होती.
कलकत्त्याला आणि भारताला भूषणावह ठरेल अशी घटना १९१३ मध्ये घडली. पाश्चिमात्य देशांनीही त्यांच्या काव्याचं कौतुक केलं. ‘गीतांजली’ या त्यांच्या काव्यसंग्रहाला ‘नोबेल पारितोषिक’ देऊन त्यांचा गौरव केला. गीतांजली काव्य संग्रहातल्या काही कवितांचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलं गेलं. गीतांजलीचे इतर अनेक भाषांतून झाल्यापासून रर्वीद्रनाथांचे निरनिराळ्या देशातले चाहते वाढले.
गीतांजलीत त्यांनी जगातील निसर्ग किती सुंदर आहे, माणमाणसात जिव्हाळ्याच्या किती भावना आहेत, आहे हे जीवन सुखाने कसं घालवता येईल याचे विचार आपल्या सोप्या, मधुर शब्दातून कथा व कवितांतून मांडले. रटाळ वाङमयाला कंटाळलेल्या लोकांना त्यांचा हा विषय व शैली नवीन वाटली व त्यांच्या या काव्यसंग्रहाला खूप लोकप्रियता मिळाली.
रवींद्रनाथ शेवटपर्यंत लिहित होते. अन् लोक प्रेमाने वाचत होते. रवींद्रनाथांनी जे जे लिखाण केलं आहे ते कल्पनारम्य व काव्यात्मक आहे. समाजातील ज्या ज्या घटना त्यांच्या मनाला जाऊन भिडत त्या त्या घटनांवर आधारित अशा कथा त्यांनी लिहिल्या आहेत. त्यांच्या कथातून कारुण्य, स्वदेशनिष्ठा, मानवप्रेम दिसून येतं.
अनाने रवींद्रनाथांना बोलके केले
अहमदाबादला त्यांचे भाऊ सत्येंद्रनाथ यांच्याजवळ असताना रवींद्रनाथांनी काव्याचा खूप अभ्यास केला. अहमदाबादहून त्यांना विलायत्ला जायचे होते. इंग्रजी बोलण्याची चांगली सवय व्हावी म्हणून तर्खडकर यांच्या कुटुंबात ते राहिले. हे कुटुंब सुधारलेलं व इंग्रजी रीतीरिवाज जाणणारं होतं. त्या कुटुंबात अन्नपूर्णा उर्फ अना नावाची नुकतीच विलायतेहून परत आलेली एक मुलगी होती. तिचा स्वभाव धीट व मोकळा होता. तिला काव्याची आवड होती. रवींद्रनाथांचा स्वभाव अबोल, लाजाळू व बुजरा. त्यातून त्या घरातील लोक उच्च शिक्षित म्हणून ते घरातील माणसात फारसे मिसळत नसत. ती विलायतेच्या गमती-जमती सांगून त्यांना हसतं बोलतं करायची.
वकील होण्यासाठी ब्रायटनला गेले
रवींद्रनाथ भावाबरोबर ब्रायटन येथे गेले. घरची मंडळी तिथे असल्याने त्यांना परदेशात बावरल्यासारखे झाले नाही. इंदिरा व सुरेंद्र या भावांच्या मुलांना गोष्टी सांगण्यात, त्यांच्याशी खेळण्यात ते रमत. पण वडिलांनी रवींद्रनाथांना मा करण्यासाठी परदेशी पाठवलं नव्हतं. त्यांनी कायद्याची परीक्षा देऊन बॅरिस्टर व्हावं अशी त्यांची इच्छा होती.
रवींद्रनाथ काही दिवस ब्रायटन येथे शाळेत गेले. त्यांना नंतर लंडन येथे पाठविण्यात आले. शिक्षणासाठी दोन तीन कुटुंबात त्यांना रहावे लागले. स्कॉट कुटुंबात त्यांचे दिवस सुखात गेले. इंग्रज लोक, इंग्रजी वाङमय व पाश्चात्य संगीत याबद्दल त्यांना खूप माहिती मिळाली.
रवींद्रनाथ कवी होतेच. तसच त्यांना भारतीय संगीताचं ज्ञानही होतं. त्यांच्या पाचही भावांना शास्त्रीय संगीत उत्तम येत असे. लंडनला गेल्यानंतर पाश्चात्य संगीत ऐकताना त्यांचं मन त्यातील मर्म जाणून घेण्यासाठी व संगीताचा अभ्यास करण्यासाठी उत्सुक असे. त्यांनी तिथे पाश्चात्य संगीताचा अभ्यास केलाही. रवींद्रनाथ पाश्चात्य संगीत चांगल्यापैकी गात असत.
अनेक नाटके लिहिली…
रवींद्रनाथ नाटक लिहीत असत व स्वतः सादर करीत असत. परदेशातून आल्यावर त्यांनी ‘कालमृगया’ व ‘वाल्मिकी प्रतिभा’ या दोन गीतनाटिका बसवल्या. त्या पाश्चात्य संगीताच्या ढंगानं बसवण्याचा प्रयत्न केला होता, इतका पाश्चात्य संगीताचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता.
रवींद्रनाथ विलायतेत सतरा महिने होते. त्यांचे शिक्षण अजून पूर्ण झालेलं नव्हतं सत्येंद्रनाथांना रजा संपल्याने कलकत्त्याला परत येणं भाग होतं. रवींद्रनाथही त्यांच्याबरोबर कलकत्त्यास गेले.
जमीनदारीची जबाबदारी
रवींद्रनाथांच्या वडिलांनी त्यांच्यावर आता जमीनदारीची जबाबदारी टाकली होती. या जमीनदारीच्या व्यवसायामुळे त्यांना निसर्गात हिंडण्याची संधीच जणू चालून आली. शेतकऱ्यांचं जीवन जवळून बघायला मिळालं. त्यांचं कवीमन जास्त काव्यमय बनलं. याच काळात त्यांची जगदीशचंद्र बोस, प्रफुल्लचंद्र रॉय, यदुनाथ सरकार इ. निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्तींशी ओळख झाली.
शांतिनिकेतन
एकदा ते शांतिनिकेतन येथे गेले असता तेथील सालवृक्ष, आमराई आणि विस्तीर्ण माळ याच्या ते प्रेमात पडले. त्यांच्या मनात येथे एक विद्यालय काढावे असे घोळू लागले आणि त्यांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणलीही. २२ डिसेंबर १९०१ रोजी रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन येथे ‘ब्रह्मचर्याश्रम’ विद्यालय सुरू केले. हे विद्यालय इतर शैक्षणिक संस्थांपेक्षा वेगळे होते. या ठिकाणी चार भिंर्तीचे वर्ग नव्हते की तास संपल्याची घंटा नव्हती. आम्रवृक्षाखाली निसर्गाच्या सान्निध्यात सारे विद्यार्थी आपले अध्ययन करीत. गायत्रीमंत्राची दीक्षा विद्यार्थ्यांना देण्यात येत असे. पर्णकुटी बांधून तिथेच रहात. रवींद्रनाथांच्या कल्पनेतील आश्रमाला मूर्त रुप आलं.
काही दिवसांनी रवींद्रनाथांच्या पत्नी मृणालिनीदेवीही आश्रमात राहण्यासाठी आल्या. आश्रमातील मुलांच्या त्या माता बनल्या. त्या मुलांसाठी फराळाचं करायच्या, त्यांची देखभाल करायच्या. त्यांनी आश्रमाला वाहून घेतले होते.
रवींद्रनाथांना सारी मुले ‘गुरुदेव’ म्हणत. ते मुलांना इंग्रजी व बंगाली शिकवत. गोष्टी सांगत, कविता म्हणून दाखवत, भक्तीगीतेही म्हणायचे, मुलांबरोबर नाटकात भाग घ्यायचे, खेळायचे.
शांतिनिकेतनची साधी रहाणी, स्वयंशासन, सहशिक्षण, स्वावलंबन, संस्कृतीवर्धन व कलोपास्ना ही वैशिष्ट्ये ठरली. तसेच विद्यार्थ्यांनी चालवलेले दुग्धालय, बागबगीचा, दवाखाना, पोस्टखाते, मुद्रणालय हेही उपक्रम कौतुकास्पद ठरले.
शांतिनिकेतनला जागतिक मान्यता
१९१८ साली शांतिनिकेतनास ‘विश्व भारती विद्यालया’चे रुप आले. भारतात या संस्थेला सर्वश्रेष्ठ विद्यालय म्हणून मान्यता मिळाली. आदर्श संस्था म्हणून या संस्थेने जागतिक लौकिक मिळवला. इतर देशातील लोकही मोठ्या उत्सुकतेने व शैक्षणिक दृष्टीने शांतिनिकेतनला भेट देऊ लागले.
विश्वभारतीमध्ये शेती, व्यापार, आरोग्य, गणित, शिल्पकला, चित्रकला, संगीत, नृत्य, सौंदर्यशास्त्र, पाकशास्त्र, हस्तकला, शास्त्रवेदांत, खगोलशास्त्र इ. सर्व प्रकारचे शिक्षण दिले जात असे.
शांतिनिकेतनचा रम्य परिसर आणि आपुलकीचं वातावरण यामुळे विद्यार्थ्यांना नवचैतन्य मिळत असे.
तत्वज्ञानाचा अभ्यास
काही वर्षांनी शांतिनिकेतनचा सारा कारभार सरकारी लोकांवर सोपवून रवींद्रनाथ बुध्दगयेला गेले. त्यांनी बुध्दाच्या तत्वज्ञानाचा अभ्यास केला. बुध्दकालीन घटनांवर व प्रसंगांवर अनेक कविता व नाटके लिहिली. स्वराज्यासाठी लढणाऱ्या शिवाजी महाराजांबद्दलही रवींद्रनाथांना खूप आदर वाटे. त्यांनी ‘शिवाजी उत्सव’ ही शिवाजीविषयीची कविता लिहिली.
जनगणमनचा जन्म
रवींद्रनाथ टागोरच्या वेळी इंग्रजी राजवट होती. देशस्वातंत्र्याचे वारे वाहात होतेच. ११ डिसेंबर १९११मध्ये बादशहा पंचम जॉर्ज हिंदुस्थानात आले होते. बंगालची फाळणी होणार होती ती ह्या बादशहाने रद्द केली होती म्हणून त्याचे आभार मानायचं काही राजकीय पक्षांनी ठरवलं होतं. त्यानिमित्त एक सभा बोलवली जाणार होती. त्या सभेत म्हणण्यासाठी राजस्तुत्तीपर गीत लिहिण्याचा आग्रह रवींद्रनाथांना झाला. पण रवींद्रनाथांना बादशहाला खूष करायचे नव्हते. त्यांना ती लाचारी वाटत होती. त्यांना या गोष्टीचा मनस्ताप झाला. त्यांच्या मनःस्तापातून त्यांच्या ‘जनगणमन’ या राष्ट्रगीताचा जन्म झाला. रवींद्रनाथांनी पंचमजॉर्जसमोर सभेत आपल्या देशाच्या स्तुतीचं गाणं गायलं. लोकांचा समज झाला या गाण्यातील भाग्यविधाता म्हणजे पंचमजॉर्जच आहे पण प्रत्यक्षात तसा अर्थ नव्हता. तर तो अर्थ असा होता की पाचवा, सहावा, सातवा कितीही बादशहा होवोत ते विधात्यापेक्षा मोठे नाहीत. हेच जनगणमन गीत पुढे भारताचं राष्ट्रगीत म्हणून अजरामर झाल.
रवींद्रनाथ गेले..
रवींद्रनाथांची पंचाहत्तरी झाली. १९४० पासून रवींद्रनाथांची तब्येत खूप बिघडली. आपल्या आयुष्यात भारत स्वतंत्र झाला पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. त्यांना औषधोपचारासाठी कलकत्त्याला राहावे लागे पण त्यांचं सारं लक्ष “शांतिनिकेतन’ कडे असे. थोडं बरं वाटताच ते शांतिनिकेतनमधे परत आले. त्यांना आता लिखाण जमत नसे म्हणून त्यांनी एक लेखनिक ठेवला होता. त्यांची तब्येत आता खूपच ढासळली होती. त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ते आपल्या जन्मगावी आले.
शेवटी ७ ऑगस्ट १९४१ साली दुपारी १२ वाजता त्यांनी जगाचा निरोप घेतला. भारताचा एक महान कवी गेला पण आपले नाव अजरामर करूनच