दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली की. पूर्वी देखील म्हणजे साठ सत्तरचे दशक ओलांडताना, महिनाभर आधी कारखाने, गिरण्या ह्यांचे बोनस जाहीर होऊ लागायचे, त्यासाठी आंदोलनाच्या बातम्या आणि जनेतेने दिवाळी सण मोठ्या आनंदाने साजरा करावा म्हणून उदार होऊन, सरकारने, फक्त रेशनवरच मिळणाऱ्या साखर, रवा, तेल, तूप वगैरे जिनसांमध्ये, शंभर दोनशे ग्राम अधिक मिळण्याची घसघशीत अशी तरतूद केली आहे. शिवाय फक्त कार्डवरच मिळणारे विशिष्ट कंपनीचे दूध, त्या सणाच्या दिवसात अर्धा एक लिटर इतके अधिक मिळणार आहे. परंतु त्यासाठीचे कडक नियम काय असतील, वगैरेच्या बातम्या वर्तमान पत्रातून येऊ लागत.
घरोघर आकाश कंदील
करण्याची लगबग सुरु होई. त्यासाठी बांबू, खळ, रंगीबेरंगी कागद, ह्यांची जमवाजमव सुरू होई. दरवर्षी लागणारे म्हणून जपून ठेवलेले रांगोळी साहित्य म्हणजे गेरू, रांगोळी, रांगोळीचे रंग, ह्यांच्या कागदी पुड्या, उदबत्तीने भोक पाडून तयार केलेला रांगोळीचा कागद, मातीच्या पणत्या ह्यांची माळ्यावरची पेटी किंवा जुनी बालदी, खाली काढून त्यातल्या वस्तूंची खात्री करून घेणे, नसल्यास त्यात नवीन भर घालणे, आकाश कंदिलात बल्ब लावण्यासाठी कायम तयार करून ठेवलेली वायर, दरवर्षी हमखास दुरुस्त करून घेऊन, लावावी लागणारी इलेक्ट्रिक दिव्याची माळ काढून चेक करून ठेवणे, दिवाळीत आणि फक्त दिवाळीतच नवीन शिवायला दिलेले कपडे तयार झालेले आहेत का, हे पाहण्यासाठी शिंप्याकडे वारंवार होणाऱ्या चकरा, पाच-सहा बहिणींकडे भाऊबिजेला एकाच दिवशी अलिबाग, कल्याण, बोरीवली आणि अर्थातच गिरगाव ह्या ठिकाणी जाण्याचा पराक्रम दरवर्षी प्रमाणे कसा पार पाडायचा, ह्यांची भाऊरायांनी केलेली आखणी.
प्रत्येक ऑफिसमध्ये दिवाळीत फटाके विकण्याचा व्यवसाय करणारा एक तरी महाभाग असायचाच. त्याच्याकडून घेतलेले आणि भावंडात भांडणे होऊ नयेत म्हणून वडिलांनी आधीच वाटून दिलेले फटाके, ते खात्रीने वाजावेत म्हणून रोज उन्हात वाळवत ठेवण्याची मुलांची धडपड, दर महिन्याच्या वाणसामानाच्या यादीत, ह्या महिन्यात सुवासिक साबण, अत्तर बाटली, आणि सुवासिक केशतेल ह्यांची भर पडायची.
ज्यांच्याकडे मुलीचा दिवाळसण ह्या वर्षी साजरा होत असेल, त्या कुटुंबात त्या वर्षीच्या दिवाळीत जावईबापूंची आणि त्याच्या सासरच्या मंडळींचे उठबस करण्यासाठी काय काय दिव्य करावी लागतील, त्यासाठी सहा महिने आधीपासून नियोजन करावे लागे. ज्यांच्या घरात चार- चार, पाच -पाच बहिणी असत, त्या कुटुंबाच्या कर्त्या पुरुषाची म्हणजे वडील आणि भाऊ ह्यांना काय काय दिव्य दिवाळीच्या त्या दिवसात करावी लागली असतील, त्याची कल्पना आताच्या मायक्रो कुटुंबाला सांगून कळणार नाही.
हे असे आनंदाचे वातावरण चहुबाजूला दिसू लागले की दिवाळीचे वेध लागले असे समजायचे. पण अजून एका गोष्टीने दिवाळी आता आठ-दहा दिवसावर येऊन ठेपली आहे हे समजायचे. ते म्हणजे, घराघरांत तयार करण्यात येणा-या दिवाळीच्या फराळाचा, सर्व वस्तीभर रोज पसरणारा खमंग दरवळ.
त्या काळात कुटुंबातील स्त्रिया हळूहळू नोकरीसाठी बाहेर पडू लागल्या होत्या, म्हणून तयार फराळाचे जिन्नस काही प्रमाणात आणि काही ठिकाणी मिळू लागले होते. परंतु, आजच्यासारखे ते व वर्षभर आणि सर्रास आणि सर्वत्र उपलब्ध नव्हते. म्हणून त्याची अपूर्वाईदेखील होती. बहुतेक कुटुंबात, स्त्रियांची कमतरता नसल्यामुळे आणि शेजारी-पाजारी लोकांचे हमखास सहकार्य मिळत असल्यामुळे; शिवाय समजा नोकरी करणाऱ्या असल्या तरी काटकसर, आवड आणि अनुकूल अशा नोकरीच्या वेळा ह्यामुळे फराळ घरी करणे सहज शक्य होत असे.
दिवाळीचा सण आनंदात साजरा होत असताना ज्या कुटुंबाने, आपल्या कुटुंबातील व्यक्ती वर्षभराच्या काळात गमावली आहे, अशांची आठवण आवर्जून घेतली जायची आणि त्यासाठी घरातील करती स्त्री त्या कुटुंबांकरता देखील फराळाचे जिन्नस न विसरता तयार करायची. आज देखील ही प्रथा पाळली जात आहे, परंतु हळू हळू तेथेही शहरी राहणीमान, आणि शहरी वृत्ती प्रवृत्तीच्या पाउलखुणा दिसून येऊ लागल्या आहेत.