बारामती (जि. पुणे) : एवढी कामे करूनही बारामतीत असे होणार असेल, तर आपली झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवावी. कारण, लाखाने निवडून येणारी आपण माणसे, जर बारामतीत असे होणार असेल, तर उभे न राहिलेले बरे, अशा शब्दांत विधानसभा निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संकेत दिले आहेत. पवार म्हणाले, बारामतीकरांच्या नादाला लागायचे काम नाही. बारामतीकरांना शिकवायला जाऊ नका, मला उडवून लावले, तर तुमचे काय? मी कोणाची दादागिरी खपवून घेणार नाही. माझ्याजवळचा कार्यकर्ता असला आणि चुकला तर मोक्का लावायला पुढे मागे पाहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
मंत्रिपद माझ्याकडे आल्यानंतर मी अर्थ खाते घेतले आणि त्यामध्ये निधी कसा आणता येईल, याचा विचार केला. अर्थ खात्यावर कुणीतरी काहीतरी बोलले, बोलणाऱ्यांना बोलू द्या, तुम्ही त्यात लक्ष घालू नका, आम्ही तिकडे बघू, असेही अजित पवार म्हणाले.
झाकली मूठ सव्वा लाखाची राहिलेली बरी
इतके करूनदेखील मला हे बघावे लागत असेल, जिथे मी दुसऱ्याला खासदार, आमदार करतो, तिथे जर अशी परिस्थिती होणार असेल, तर झाकली मूठ सव्वा लाखाची राहिलेली बरी, असे पवार म्हणाले.