अजित डोभाल यांचे ‘मिशन रशिया-युक्रेन’पंतप्रधान मोदींनी सोपवली जबाबदारी

नवी दिल्ली : अमेरिका-रशिया शीतयुद्ध काळात त्या परिस्थितीनुसार हॉलिवूडमध्ये ‘००७ जेम्स बाँड’चे वारे होते. चित्रपटातील अमेरिकेचा हा गुप्तहेर वाट्टेल ते धाडस करून जगाला वेगवेगळ्या संकटांतून वाचवायचा. आता या कथेप्रमाणेच युक्रेन-रशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील अमेरिकेच्या जागेवर भारत आला आहे आणि जेम्स बाँडच्या जागी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याची ‘सिक्रेट’ जबाबदारी सोपवली आहे.

रशिया-युक्रेन संघर्ष सोडवण्याच्या दृष्टीने या आठवड्यात डोभाल रशिया दौरा करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी मागच्या महिन्यात रशिया आणि युक्रेनचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी युद्ध थांबवण्यावर चर्चा केली होती. त्यानंतर जगाच्या नजरा भारताकडे लागल्या आहेत.

झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केल्यानंतर मोदी यांनी २७ ऑगस्ट रोजी पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यात मोदींनी युद्ध संपुष्टात आणण्यासाठी भारताच्या वचनबद्धतेवर भर दिला. याच फोन कॉलदरम्यान डोभाल शांतता चर्चेसाठी मॉस्कोला जातील, असे ठरल्याचे सूत्रांनी सांगितले.

पुतिन यांनाही भारताकडून आशा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनीही नुकतेच आपण चीन, ब्राझील आणि भारताशी युक्रेन युद्धासंदर्भात सतत संपर्कात आहोत, असे सांगत भारत याबाबतीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे संकेत दिले होते.

भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो : मेलोनी

जगभरातील अनेक नेते आता रशिया-युक्रेन संघर्ष संपवण्यात भारत मोठी भूमिका बजावू शकतो, असे मानत आहेत. त्यातच शनिवारी एका कार्यक्रमात इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनीही भारत, चीन हा प्रश्न सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

९२६ दिवसांपासून सुरु आहे रशिया-युक्रेन युद्ध

२४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला. या युद्धाला ८ सप्टेंबर २०२४ रोजी ९२६ दिवस पूर्ण झाले. २०२१ पासूनच रशियाने या युद्धाची तयारी केली होती. ‘नाटो’त सामील झाल्यामुळे युक्रेनवर निर्बंध लादून लष्करी कारवाई करावी, अशी मागणी रशियन जनतेने केली होती.

Leave a Comment